Parliament Monsoon Session 2021: लोकसभा मुदतीपूर्वीच अनिश्चित काळासाठी स्थगित, विरोधकांकडून जारदोर टीकास्त्र
Parliament building (Photo Credits: Twitter)

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session 2021) सुरु असताना लोकसभेचे कामकाज बुधवारी (11 ऑगस्ट) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यामुळे एकप्रकारे संसदेचे अधिवेशन गुंडाळण्यात आले आहे.सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संसदेचे अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी समाप्त होणार होते. सकाळी 11 वाजता लोकसभचे कामकाज सुरु झाले. त्यानंतर लोकसभा (Lok Sabha) अध्यक्ष ओम बिरला यांनी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यानंतर नित्यानंद मिश्रा, गोपालराव मायेकर आणि सुदर्शन रॉय चौधरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लगेचच सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

लोकसभा अध्यक्षांनी म्हटले की, पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेचे कामकाज ज्या पद्धतीने चालायला हवे होते त्या पद्धतीने चालले नाही. संपूर्ण अधिवेशनात सभागृहाचे कामकाज केवळ 21 तास 14 मिनिटे चालले. त्यांनी म्हटले की, चर्चा आणि इतर विधायक कार्यासाठी राखीव असलेल्या 96 तासांपैकी 74 तास वाया गेले. सभागृहात केवळ 22% काम झाले.

लोसभा अद्यक्ष ओम बिरला यांनी म्हटले की, या कालावधीत 127 वे घटनादुरुस्ती विधेयक 2021 सह 20 महत्त्वाची विधेयके पारित करण्यात आली. 66 तारांकीत प्रश्नांना उत्तर देण्यात आले. सदस्यांद्वारा 331 प्रश्न उपस्थित करण्यात आले. या दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहात 22 उत्तरे दिली. (हेही वाचा, 127th Constitution Amendment Bill: राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल, 50% आरक्षण मर्यादेचे त्रांकडे अद्यापही कायम)

19 जुलै रोजी अधिवेशन सुरु झाले. त्यानंतर पेगासास हेरगिरी वाद, कृषी कायदा, महागाई आणि इतर मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सभागृहात गोधळ घातला. परिणामी अनेक वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. दरम्यान, 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर विरोधक आणि सरकार यांच्यात सहमती बनली. विधेयकावर सविस्तर चर्चा होऊन हे विधेयक मंजूरीही झाले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आहे. नियम 377 अन्वये विचारले गेलेले अनेक प्रश्न राखून ठेवण्यात आले.