Utpal Parrikar: मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल यांना भाजपने नाकारले तिकीट, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी BJP उमेदवारांची यादी जाहीर
Utpal Parrikar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाने (Goa) गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे पूत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) तिकीट नाकारले आहे. भाजपने आज (गुरुवार, 20 जानेवारी) विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात उत्पल पर्रिकर यांचे नाव नाही. उत्पल पर्रिकर यांनी पक्षाकडे पणजी (Panaji) विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितले होते. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीनुसार पर्रिकर यांना तिकीट मिळाले नाही. या ठिकाणी अतनासियो 'बाबुश' मॉन्सेरेट ( Atanasio "Babush" Monserrate) यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने त्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे आता उत्पल पर्रिकर पुढे काय करणार याबाबत उत्सुकता आहे.

भाजपने उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारल्याचे समजताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी त्यांना आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लण्याचे अवाहन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीचे वृत्त ट्विट करत म्हटले की, भाजपने मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबालाही 'यूज अँड थ्रो' नितीने वागवले आहे याचे गोव्याच्या प्रत्येक नागरिकाला दु:ख होत आहे. आम्ही नेहमीच मनोहर पर्रिकर यांचा सन्मान केला. आम आदमी पक्षात प्रवेश करुन निवडणूक लढविण्यासाठी उत्पल पर्रिकर यांना शुभेच्छा, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Goa Assembly Election 2022: 'उत्पल पर्रीकर' यांना BJP ने पणजीतून निवडणूक लढवण्याची संधी दिलीच पाहिजे'- Sanjay Raut)

उत्पल पर्रिकर यांना नाकारुन भाजपने ज्या अतनासियो 'बाबुश' मॉन्सेरेट ( Atanasio "Babush" Monserrate) यांच्यावर विश्वास दाखवला आहे ते पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेस उमेदवार आहेत. नंतर पुढे ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. हीच जागा उत्पल यांनी मागितली होती.

महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने गोवा विधानसभा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे कितीही नाकारले तरी उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच येऊन पडते. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते की, 'मनोहर पर्रिकर यांचे कुटंब म्हणजे आमचे कुटुंब आहे. उत्पल पर्रिकर यांच्याशी चर्चा झाली. आम्ही त्यांना दोन पर्याय दिले होते. त्यांनी पहिला पर्याय नाकारला. दुसऱ्या पर्यायावर चर्चा सुरु आहे. आम्हाला वाटते की ते आमचे ऐकतील.'