Goa Assembly Election 2022: 'उत्पल पर्रीकर' यांना BJP ने पणजीतून निवडणूक लढवण्याची संधी दिलीच पाहिजे'- Sanjay Raut
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना पणजीतून (Panaji) निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, असे मत शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांनी सोमवारी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांना पाठिंबा देऊन त्यांना सत्तेत आणले पाहिजे. गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या प्रस्तावित विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात स्पर्धेची फेरी सुरू झाली आहे.

सत्ताधारी भाजपकडून खुर्ची हिसकावून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. अशात मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गोव्याची राजधानी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. एवढेच नाही तर भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. आता संजय राऊत यांनी भाजपने उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट दिलेच पाहिजे, असे म्हटले आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासात योगदान दिले, परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला अनादराचा सामना करावा लागला. त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट दिलेच पाहिजे. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांना पाठिंबा देऊन त्यांना सत्तेत आणले पाहिजे.’

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले की, त्यांचा पक्ष गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर या पक्षात सहभागी होण्यास इच्छुक असल्यास त्यांचे स्वागत करेल. उत्पल पर्रीकर, त्यांच्या वडिलांनी दोन दशकांहून अधिक काळ प्रतिनिधित्व केलेल्या पणजी विधानसभेच्या जागेसाठी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सत्ताधारी पक्षाने त्यांना डावलले होते. (हेही वाचा: गोव्यात मोफत वीज, पाणी आणि शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये - अरविंद केजरीवाल)

आता या विधानसभा निवडणुकीसाठी उत्पल यांनी त्यांचे वडील मनोहर पर्रीकर यांची जागा असलेल्या पणजीत घरोघरी प्रचार सुरूही केला आहे. 2019 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने या जागेवरून सिद्धार्थ श्रीपाद कुंकळणीकर यांना तिकीट दिले होते. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले आणि त्यांनी ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली.