Goa CM Manohar Parrikar | (Photo Credits: IANS)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांच्या वैद्यकीय तपासणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) पणजी खंडपीठाने फेटाळली आहे. पर्रिकरांचे गोपनियतेचे अधिकार लक्षात घेऊन ही याचिका फेटाळण्यात आली आहे. तसंच आजारपणामुळे संवैधानिक पदावरुन हटवता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले आहे.  मनोहर पर्रिकरांच्या स्वास्थ्य संबंधित माहिती सार्वजनिक केली जावी, असे या याचिकेत म्हटले होते.

मनोहर पर्रिकर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आजारपणामुळे संवैधानिक पदावरुन हटवता येणार नाही. तसंच आजारपणामुळे संबंधित व्यक्ती पदासाठी अयोग्यही ठरत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

पर्रिकर गेल्या काही काळापासून कॅन्सरने ग्रस्त आहेत. नऊ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दीर्घ काळ आजारी असल्याने त्यांनी राजिनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच नाकात ड्रीप असतानाही त्यांनी मांडवी येथील पुलाची पाहाणी केली होती.