दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपने उद्योजक श्रीनिवास डेम्पो यांच्या पत्नी पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पल्लवी डेम्पो यांची संपत्ती नक्कीच भुवया उंचावणारी आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील उदयनराजे भोसले आणि शाहू छत्रपती यांच्या संपत्तीपेक्षाही जास्त डेम्पो यांची संपत्ती आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातून पल्लवी डेम्पो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत, दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती तब्बल 1400 कोटी रुपयांची आहे. (हेही वाचा - Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्याबद्दलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी? पक्षात चलबिचल)
गोवा राज्यातील लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या 2 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. पल्लवी यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते.पल्लवी यांनी दाखल केलेल्या 119 पानांच्या प्रतिज्ञापत्रात पती श्रीनिवास ढेम्पो यांच्यासह पल्लवी यांची एकूण संपत्ती सुमारे 1,400 कोटी रुपये आहे. त्यात, विदेशात बंगले, लग्झरी कार, सोने-नाणे आणि कोट्यवधींचे बाँड आहेत.
पल्लवी यांच्याकडे वेगवेगळ्या सीरिजच्या तीन मर्सिडीज बेंझ कार आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 1.69 कोटी, 16.42 लाख, 21.73 लाख रुपये आहे. कॅडिलॅक कार आहे, ज्याची किंमत ३० लाख आहे.तसेच, महिंद्रा थार एसयूव्ही, ज्याची किंमत 16.26 लाख रुपये आहे.
पल्लवी यांच्याकडे त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे दिसून येते, तर श्रीनिवास यांच्या मालकीच्या मालमत्तेचे मूल्य 994.8 कोटी रुपये आहे. पल्लवी यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 28.2 कोटी रुपये आहे, तर श्रीनिवास यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 83.2 कोटी रुपये आहे. श्रीनिवास डेम्पो यांच्या गोवा आणि देशाच्या इतर भागांतही मालमत्ता असून या जोडप्यांकडे दुबईत एक अपार्टमेंट देखील आहे, ज्याचे सध्याचे बाजार मूल्य 2.5 कोटी रुपये आहे. तर, लंडनमध्येही 10 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.