पाकिस्तानी गुप्तहेराला जयपूर कारागृहात कैद्यांकडून बेदम मारहाण; जागेवरच मृत्यू
jail | (Photo credit: archived, edited, representative image)

Pulwama Terror Attack: पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात तीव्र तणाव आहे. या तणावाचे पडसाद सर्व स्तरातून उमटत आहेत. दरम्यान, राजस्थान ( Rajasthan) येथील जयपूर कारागृहातही या तणावाचे तीव्र पडसाद बुधवारी (20 फेब्रुवारी) उमटताना पाहायला मिळाले. जयपूर मध्यवर्ती कारागृहात (Jaipur Central Jail) असलेला पाकिस्तानी कैदी शकीरूल्लाह याला कारागृहातील इतर कैद्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शकीरूल्लाह याचा जागेवरच मृत्यू झाला. पाकिस्तानचा गुप्तहेर असल्याचा शकीरूल्लाह याच्यावर आरोप होता.

प्राप्त माहितीनुसार, कारागृहात प्रशानसनाचे वरिष्ठ अधिकारी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सरु आहे. दरम्यान, हेरगिरीच्या आरोपावरुन शकीरूल्लाह हा जयपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान, गेल्या जानेवारी महिन्यात पाकिस्तानने भारतात बंदिवान असलेल्या कैद्यांची (पाकिस्तानी नागरिक) यादी भारताला दिली होती. पाकिस्तानच्या दाव्यानुसार भारतात पाकिस्तानचे सुमारे 350 पेक्षाही अधिक नागरिक बंदिवान आहेत. यात मच्छिमार आणि सीमा ओलांडून भारतात आलेल्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या उभय देशांमध्ये कारागृहात बंद असलेल्या नागरिकांचे माहिती एकमेकांना देणे बंधनकारक आहे.

पाकिस्तानी नागरिकांसाठी अल्टीमेटम

दरम्यान, राजस्थान येथील बीकानेर येथे पाकिस्तानी नागरिकांबाबत अल्टीमेटम जारी करण्यात आला होता. बीकानेरचे डीएम कुमार पाल गौतम यांनी तिथे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तानी पर्यटकांना 48 तासांच्या आत शहर सोडण्यास सांगण्यात आले होते. या अल्टीमेटवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर अनेक संघटनांनी नवी दिल्ली येथे पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली होती. तर, भारत सरकारही पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी कुटनिती आखताना दिसत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्त सोहेल महमूद यांना परत पाठवले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना इस्लामाबादवरुन भारतात बोलावले होते. (हेही वाचा, Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना CREDAI राहत्या शहरात देणार 2BHK फ्लॅट्स)

पुलवामा हल्ल्यात 42 जवान शहीद

सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४2 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यानंतर बॉलिवुडसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्याविरोधात पाकिस्तान विरोधात भारतामध्ये तीव्र संतापाची लाट कायम आहे.