20 कोटीहून अधिक पॅन कार्ड रद्द होण्याच्या मार्गावर; आपले PAN Card वाचवण्यासाठी 31 ऑगस्टपूर्वी करावे लागेल 'हे' काम
PAN Card-Aadhar Card Link (File Photo)

देशात 20 कोटीहून अधिक पॅन कार्ड (PAN Card) रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने निर्णय घेतला आहे की, 31 ऑगस्ट 2019 पर्यंत व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार, कंपनी, ट्रस्ट किंवा इतर कोणत्याही श्रेणीमध्ये जारी केलेले पॅन कार्ड जर का आधार कार्डशी जोडले गेले नाही तर त्याला अपात्र घोषित केले जाईल. आयकर विभागाने (Income Tax Department) एकदा का अपात्र म्हणून घोषित केले की, अशा पॅन कार्ड चा वापर केला जाऊ शकत नाही.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या देशात 43 कोटी पॅन कार्ड धारक आहेत, तर 120 कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे अवघड ठरणार नाही. ज्या लोकांकडे आधार कार्ड नसेल त्यांना नवीन आधार कार्ड घेण्यासाठी 40 पेक्षा जास्त दिवसांचा अवधी मिळत आहे. इतक्या दिवसात सहज आधार कार्ड मिळू शकेल. (हेही वाचा: आता Income Tax Return फाईल करण्यासाठी आधार-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)

पॅन कार्ड तयार करून त्याचा वापर फक्त कर्ज घेण्यासाठी केला जात आहे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी आता पॅनला आधार शी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. आयकर कायदा कलम139 एए मध्ये एक उपधारा जोडून ही तरतूदी करण्यात आली आहे. पॅन आणि आधार एकमेकांशी जोडले नाही तर, 1 सप्टेंबर 2019 पासून हे पॅन कार्ड अपात्र ठरेल. त्यानंतर त्याला आयकर विभागाच्या डेटा बेसमधून हटवले जाईल.