Coronavirus in India: देशातील कोरोना व्हायरस रुग्णांचा रिकव्हरी रेट 29.9% तर मृत्यू दर 3.3% - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन
Union Health Minister Dr. Harsh Vardhan (Photo Credits: ANI)

भारतात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एक आशादायी माहिती समोर येत आहे. देशातील मृत्यू दर 3.3% इतका असून रिकव्हरी रेट 29.9% आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट नक्कीच चांगला आहे. गेल्या 3 दिवसांपासून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 11 दिवसांचा आहे. तर मागील 7 दिवसांपूर्वी हा कालावधी 9.9 दिवस इतका होता. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशात इतर प्रगत देशांप्रमाणे बिकट परिस्थिती निर्माण झालेली नाही. तरी देखील आपण भयंकर परिस्थितीला सामोर जाण्यासाठी तयारी करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान मागील 24 तासांत 3320 नव्या रुग्णांची भर पडली असून 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 59662 इतकी झाली आहे. तर 17846 रुग्ण कोरोना संसर्गातून रिकव्हर झाले असून 39834 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर 1981 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. (कोविड 19 विरुद्ध AYUSH Medicines च्या क्लिनिकल ट्रायल्सला सुरुवात; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती)

ANI Tweet: 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी आयुष मेडिसिन्सच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु झाल्या असल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती. याच्या ट्रायल्स आरोग्य सेवक तसंच कोरोना बाधितांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींवर करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याचे परिणाम तपासण्यात येतील.