Odisha Floods: ओडिसा येथे पुराचे थैमान, 17 जणांचा बळी तर 14 लाखांहून अधिक जणांना फटका
Floods (Photo Credits: IANS)

ओडिसा येथे पुराने थैमान घातले असून त्या संबंधित घटनेत 17 जणांचा बळी गेला असून जवळजवळ 10,382 घरांचे नुकसान झाले आहे. राज्यातील 20 जिल्ह्यातील 3256 गावात पुरामुळे 14,32,701 लोकांना फटका बसला आहे. ओडिसा डिझास्टर रॅपिड अॅक्शन फोर्स (ODRAF) च्या जवानांनी फटक बसलेल्या परिसरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव केला आहे. आपत्ती विभागाने असे म्हटले आहे की, सातत्याने होणाऱ्या पावसामुळे ब्राह्मणी, बैतरणी, सुवर्ण रेखा, जलका, बुढाबलंग आणि महानदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सखल भाग पाण्याखाली गेले आहेत.

ओडिसा सरकारच्या मते रविवार पर्यंत राज्यात 17 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 18,382 घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील 20 जिल्ह्यात 3256 गावांत पुराचे पाणी शिरले आहे. राज्यातील एनडीआरफची टीम, वायुसेना आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु आहे.(Swine Flu: कोरोना व्हायरस संकटात देशात स्वाइन फ्लूचा धोका; जुलै पर्यंत 2,721 रुग्णांची व 44 मृत्यूंची नोंद)

अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, महानदीच्या पुराच्या पाण्यामुळे रविवारी किनाऱ्यालगची गावे वाहून गेली आहेत. राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनची 15 पथक, ओडीआरएफची 14 पथक आणि बचाव कार्यासाठी सखल भागात अग्निशमन दलाच्या 119 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे असे म्हटले आहे की, हिराकुंडच्या पाण्याचा स्तर वाढून 626.65 फुट झाले आहे. तर जलाशयाचा उच्चतम स्तर 630 फूट आहे. पाण्याचा जबरदस्त प्रवाह आणि पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अतिरिक्त पाणी सोडले जात असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

ओडिसा मधील सर्वात मोठी नदी असलेल्या महानदीच्या खोऱ्याच्या क्षेत्रात स्थिती गंभीर झाली आहे. कारण नदीचा स्तर वाढवून धोक्याची पातळीवर पोहचला आहे. महानदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने ओडिसा मधील काही भागात पूर्णपणे नुकसान झाले आहे.