Coronavirus Outbreak .in India (Photo Credits: AFP)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) हा विषाणू आपली पाळंमुळे अधिकाधिक घट्ट करु लागल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. भारतात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 341 वर गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही खूप धक्कादायक बातमी असून अन्य देशांप्रमाणे आता भारतातील स्थिती देखील चिंताजनक बनत चालल्याचे चित्र यावरून दिसून येतय. ही संख्या कमी झाली नाही तर पुढचे काही दिवस देशासाठी खूप त्रासदायक ठरू शकतात अशी भीती आता वाटू लागली आहे. भारत सरकार आपल्या परीने जितके होईल तेवढे उपाययोजना करण्याचे प्रयत्न करत आहेत.

काही वेळापूर्वी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 324 झाली होती. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 74 रुग्ण असून दोघांचा बळी गेला आहे. तर देशात एकूण 5 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संख्येत आता भर होऊन भारतात एकून कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या ही 341 इतकी झाली आहे. भारतात कोरोना व्हायरस स्टेज 2 ला आहे. त्यामुळे धोक्याची घंटा मिळण्यापूर्वी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जाते आहेत. मात्र तरी देखील रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेत टाकणारी आहे. 'मुंबई लोकल' सेवा आज मध्यरात्रीपासून बंद; Coronavirus च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

हेदेखील वाचा- Coronavirus In India: कोकण रेल्वे सह भारतीय रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेन्स सेवा 31 मार्च पर्यंत खंडीत

या पार्श्वभूमीवर भारतात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' लावला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना ग्रस्तांचा आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच महाराष्ट्रात लॉकडाऊन ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 144 कलम लागू करण्यात असून किमान 31 मार्चपर्यंत हा लॉकडाऊन ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच या काळात महाराष्ट्र अन्नधान्य, वैद्यकिय सुविधा, दूध-पुरवठा नियमित सुरु राहणार असून ते वगळता अन्य सर्व सार्वजनिक सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता मुंबई लोकल रेल्वे, बस, मेट्रो, मोनो देखील बंद ठेवण्यात आली आहे.