कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे देशात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. अशात लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. आता कोरोनाचा संसर्ग वेगन पसरत असताना, टपाल विभागाने पुन्हा एकदा लोकांना कोरोना संसर्गापासून वाचवण्याची जबाबदारी घेतली आहे. आता टपाल खाते जीवनरक्षक औषधे घरपोच पोहोचवण्याची आणि बँकेतून पैसे काढण्याची सुविधा देईल. पोस्टमनद्वारे (Postman) अधिका-यांच्या देखरेखीखाली टपाल खाते ही जबाबदारी पार पाडेल.
सध्या देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. अशावेळी टपाल विभागाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी, पोस्टमनच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचविण्याचे काम केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. पोस्ट ऑफिसमधून पार्सलने येणारी जीवरक्षक औषधे अधिका-यांच्या माहितीत असतील व ती कमीत कमी वेळात पोहोचवण्याचा अधिकारी प्रयत्न करतील.
अत्यावश्यक व तातडीच्या औषधांच्या बाबतीत, सुट्टीच्या दिवशी किंवा रात्रीदेखील काम केले जाईल. जीवरक्षक औषधे पाठवणाऱ्याला पार्सलवर ‘जीवनरक्षक औषध’ असे नमूद करावे लागेल. दुसरीकडे, सध्याच्या काळात लोकांना पैसे काढण्यासाठी बँक किंवा एटीएममध्ये देखील जाण्याची गरज नाही. कारण आता घरबसल्या ही सुविधा पोस्टमनकडून मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँक खात्यातून पैसे काढू शकेल. (हेही वाचा: Post Office Scheme देतेय वर्षाला 6.6% रिटर्न; पहा कशी कराल गुंतवणूक, पात्रता निकष काय आणि महत्त्वाची माहिती)
पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक उघडली गेली आहे, व गावातील पोस्ट ऑफिस आणि पोस्टमनना हॅन्डहेल्ड मशीन देण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे, ज्या खातेदाराचे खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, असे खातेदार पोस्टमनकडे असणाऱ्या मशिनवर अंगठा लावून, बँकेचे नाव निवडून पैसे काढू शकतील. याद्वारे एक व्यक्ती एका दिवसात जास्तीत जास्त दहा हजार रुपये काढू शकेल.