देशातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून पळून गेलेल्या नीरव मोदी (Neerav Modi) आणि विजय मल्ल्या (Vijay Mallya) साठी मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) जेल मध्ये खास कारागृहाची सोय करण्यात येत आहे. विशेष म्हणजे एखाद्या सामान्य माणसाच्या घरात देखील जितक्या सुविधा असणार नाहीत तितक्या अद्ययावत सुविधांनी युक्त असे कारागृह असणार आहे. नीरव व मल्ल्या हे दोघेही आता परदेशात असून त्यांच्यावर संबंधित देशात कारवाई सुरु आहे, कारवाईनंतर जेव्हा त्यांना भारताकडे पुन्हा सोपवण्यात येईल तेव्हा त्यांना आर्थर रोड वरील या जेल मध्ये ठेवले जाणार असल्याचे हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनुसार समजत आहे. मुंबई मध्ये 300sq. ft च्या या जेल मध्ये या दोन्ही गुन्हेगारांना छप्परापर्यंत उंच खिडक्या, लाईट्स, फॅन्स, नव्याने रंगवलेल्या भिंती, 24 तास पाणी पुरवठा अशा फर्स्ट क्लास सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
आर्थर रोड जेलच्या बॅरॅक क्रमांक 12 मध्ये या दोघांनाही ठेवण्यात येणार आहे ,माध्यमांच्या माहितीनुसार या जेलला अलीकडेच नवीन अद्ययावत रूप देण्यात आले होती, तूर्तास यापैकी दोन जेल तयार असून अन्य दोन जेल ची कामे सुरु आहेत. पण या जेल न्यायालयीन कारवाई सुरु असतानाच पुरवण्यात येतील, गुन्हा सिद्ध झाल्यावर मात्र या दोघांना अन्य कैदींप्रमाणे एक चटई, उशी, व चादर एवढेच पुरवण्यात येईल. युरोपियन नियमांच्या अनुसार मल्ल्याला या जेल मध्ये स्वतंत्र तीन स्क्वेअर मीटर जागा पुरवण्यात येईल. मुंबईतील कारागृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जेलच्या बांधणीबाबत अहवाल राज्याच्या गृह मंत्रालयाला दिला आहे. Vijay Mallya चे भारतात प्रत्यार्पण होणार, London कोर्टाने दिली मंजुरी
दरम्यान बुधवारी युके उच्च न्यायालयाने मल्ल्याची जामीन याचिका चौथ्यांदा फेटाळून लावली आहे. 2016पासून कुख्यात दारूव्यापारी विजय मल्ल्या हा युके मध्ये स्थायिक आहे, अनेकदा त्याला सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त वावरताना पाहायला मिळाले आहे. तर पीएनबी बँकेचा 14,000 कोटींचा घोटाळा करून फरार झालेला नीरव मोदी हा मार्च महिन्यापासून लंडनच्या वान्ड्सवर्थ जेल मध्ये असल्याचे सांगण्यात आले होते. या दोघांना भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.