Nilesh Rane shared Sharad Pawar's Birthday Celebration Video (Photo Credits: Twitter & IANS)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा काल (12 डिसेंबर) 80 वा वाढदिवस होता. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी नागरिकांची स्टेजवर एकच झुंबड उडाली. या घटनेचा व्हिडिओ भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शेअर केला आहे. "60 वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती पाहायला मिळते. हे पाहून मन खचून गेले," असेही त्यांनी म्हटले आहे. (पवार कुटुंबीयांनी शरद पवारांचे 80 व्या वाढदिवसानिमित्त केले खास औक्षण, Watch Video)

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "मन खचून गेले हे बघून... महाराष्ट्रात 60 वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहीना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या 60 वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते."

निलेश राणे ट्विट:

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदा याला देखील आमंत्रित करण्यात आले होते. तसंच 81 किलोचा केकही आणण्यात आला होता. मात्र कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यावरुन निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरुन निलेश राणे यांनी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना देखील लक्ष्य केले होते. रोहित पवार जीन्स आणि टीशर्ट घालून मंत्रालयात उनाडक्या करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.