नुकतेच दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) चोरीच्या (Theft) एका नव्या स्टाइलचा पर्दाफाश केला आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. गेल्या वर्षभरात या चतुर चोराने 110 दिवसांत 200 वेळा विमान प्रवास करून, चक्क विमानातच अनेक लोकांच्या मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. एका महिलेच्या तक्रारीवरून या चोरट्याला अखेर ताब्यात घेण्यात आले. गेल्या महिन्यात हैदराबादहून दिल्लीला जाणाऱ्या एका महिलेने दावा केला होता की, तिच्या बॅगमधून 7 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. यानंतर, पोलिसांना एका अमेरिकन व्यक्तीची तक्रार देखील मिळाली, ज्यामध्ये त्याच्या केबिन बॅगमधून 20 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही तक्रारींनंतर पोलिसांनी सर्व विमानतळांवरून अनेक तासांचे फुटेज शोधून राजेश कपूर नावाच्या या चोरट्याला अटक केली.
दिल्ली, हैदराबाद आणि अमृतसर विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर पोलिसांनी राजेश कपूरला दिल्लीच्या पहाडगंज परिसरातून अटक केली. चौकशीमध्ये तो गेल्या एक वर्षापासून अशा चोरी करत असल्याचे समोर आले. देशाच्या सर्वात सुरक्षित भागांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विमानतळावर चोरी करून पळून जाण्यात हा चोर कसा यशस्वी झाला, याचेच पोलिसांना आश्चर्य वाटते. पोलिसांच्या चौकशीत राजेश कपूरने सांगितले की, चोरीसाठी त्याने कनेक्टिंग फ्लाइट घेणाऱ्या प्रवाशांना टार्गेट केले.
उदाहरणार्थ, एप्रिलमध्ये हैदराबादहून दिल्लीला जाणाऱ्या या महिलेला दिल्लीच्या विमानतळावरून पुढे अमेरिकेला जाणारे एअर इंडियाचे कनेक्टिंग फ्लाइट पकडायचे होते. त्याचप्रमाणे अमेरिकन रहिवासी वरजिंदरजीत सिंग हे अमृतसरहून फ्रँकफर्ट, जर्मनीला जात होते आणि दिल्लीहून त्यांचे कनेक्टिंग फ्लाइट होते. राजेशने वृद्ध आणि महिला प्रवाशांना आपले लक्ष्य म्हणून निवडले. लक्ष्य निश्चित झाल्यावर तो विमानतळावरील त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवत असे. तो त्यांच्या बॅगचा पाठपुरावा करायचा आणि बॅगेज डिक्लेरेशन स्लिपवर दिलेली माहिती अतिशय हुशारीने वाचायचा.
त्यानंतर तो विमान कंपनीला त्याची सीट बदलण्याची विनंती करत असे जेणेकरून तो प्रवाशाशेजारी बसू शकेल. पोलिसांनी सांगितले की, तो अनेकदा लक्ष्य असलेल्या प्रवाशाजवळ बसायचा आणि नंतर बॅग ओव्हरहेड विभागात ठेवण्याचा बहाणा करून त्यांचे सामान चोरायचा. अशा प्रकारे त्याने दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, चंदीगड, बेंगळुरू, मुंबई आणि अमृतसर यांसारख्या अनेक विमानतळांवरून उड्डाण करणाऱ्या महिला प्रवाशांच्या बॅगमधून मौल्यवान वस्तू चोरल्या. (हेही वाचा: Delhi Crime: दिल्लीत चोरांनी भिंतीला खड्डा पाडून टाकला ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा)
दरम्यान, राजेशचे पहाडगंजमध्ये रिकी डिलक्स हे गेस्ट हाऊस आहे. तो स्वत: गेस्ट हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो आणि बाकीचे मजले ग्राहकांसाठी होते. त्याचा दिल्लीत मनी एक्स्चेंजचा व्यवसाय आणि मोबाईल दुरुस्तीचे दुकान असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पुढे सांगितले की, फ्लाइटमध्ये चोरी करणारा राजेश पूर्वी ट्रेनमध्ये चोरी करायचा. मात्र, तेथे पकडल्यानंतर तो काही दिवस शांत राहिला आणि नंतर विमानतळावर चोरीची योजना आखण्याचा निर्णय घेतला. आता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.