New Coronavirus Strain: UK विमान वाहतुकीवर 7 जानेवारी 2021 पर्यंत बंदी: हरदीपसिंग पुरी
Civil Aviation Minister Hardeep Singh Puri (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या (Coronavirus New Strain) धोक्याच्या पार्श्वभूमीवर युके (UK) मधून होणारी विमान वाहतूकीवरील बंदीत वाढ करण्यात आली आहे. 7 जानेवारी 2021 पर्यंत युके मधून येणाऱ्या-जाणाऱ्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीपसिंग पुरी (Union Minister of Civil Aviation Hardeep Singh Puri) यांनी दिली. त्याचबरोबर कडक नियम लागू करत उड्डाणं सुरु करण्यात येतील. परंतु, त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे पुरी यांनी सांगितले.

यापूर्वी 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत युके मधून होणाऱ्या विमान वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, युरोपीयन देशांत कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा वाढता संसर्ग लक्षात घेता उड्डाणांवरील बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

Hardeep Singh Puri Tweet:

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे 14 रुग्ण भारतात आढळून आले होते. आता ती संख्या 20 वर गेली आहे. हे सर्व रुग्ण युके हून परत आले होते. यापैकी 8 जण दिल्ली, 2 हैद्राबाद, 1 कोलकत्ता, 1 पुणे येथील आहेत. (कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेन वर देखील Covaxin प्रभावी ठरु शकते: Bharat Biotech)

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन युके मध्ये या महिन्याच्या सुरुवातीला आढळून आला. हा व्हायरस सध्याच्या कोविड-19 पेक्षा 70 टक्के अधिक वेगाने पसरतो. त्यामुळेच खरबदारीचा उपाय म्हणून अनेक देशांनी युरोपीयन देशांमधून येणाऱ्या अनेक विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक नसून कोविड-19 लस त्यावर परिणामकारक ठरेल, असा दावा तज्ज्ञ करत आहेत.