यूकेमध्ये (UK) कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन (New Coronavirus Strain) सापडल्याने खळबळ उडाली आहे. बहुतेक देशांनी युके तसेच युरोपमधून येणाऱ्या प्रवासी विमानांवर निर्बंध घातले आहेत. भारतानेही युकेमधून येणारी विमाने स्थगित केली आहेत. या ताणतणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. काल यूकेहून दिल्लीला आलेल्या विमानमधील 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. नोडल अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केबिन क्रूसह एकूण 266 प्रवासी काल रात्री लंडनहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानात होते. सर्वजणांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली.
कोरोना अहवाल नकारात्मक आलेल्या सर्व प्रवाशांना 7 दिवस होम क्वारन्टाईनमध्ये रहावे लागेल. त्यांची सर्व माहिती जिल्हा कार्यालयाशी शेअर केली जाईल. त्यांच्या तब्येतीबद्दल रोज अपडेट्स घेतले जातील आणि त्यानंतर सहाव्या दिवशी या सर्वांच्या पुन्हा चाचण्या केल्या जातील. दुसरीकडे सकाळी 6.30 वाजता ब्रिटीश एअरवेजचे विमानदेखील दिल्लीत दाखल झाले आहे. ब्रिटीश एअरवेजच्या विमानात केबिन क्रूसमवेत एकूण 213 प्रवासी होते, या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी होणार आहे.
21 डिसेंबर रात्री 10.30 वाजता आलेल्या विमानमधील 266 पैकी 5 प्रवासी सकारात्मक आढळल्यानंतर सर्व प्रवाशांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. सकारात्मक लोकांचे नमुने गोळा केले गेले आहेत, जे एनसीडीसीमध्ये पुढील संशोधनासाठी पाठविले जातील. देशातील जनता कोरोनाची लस लवकरच येईल या आशेवर असताना या नव्या स्ट्रेनने सर्वांना चिंतेत टाकले आहे. (हेही वाचा: भारतामध्ये कोविड 19 लस कधी येणार? कोरोनाबाधित रूग्ण लस घेऊ शकतात का? जाणून घ्या कोविड 19 लसीकरणाबद्दल सार्या गोष्टी)
दरम्यान, दिल्ली सरकारने निन्र्णय घेतला आहे की गेल्या 2 आठवड्यात यूकेहून दिल्लीत आलेल्या सर्व लोकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जाईल. यावर आजपासून कारवाईही सुरू झाली आहे. सरकारकडून प्राप्त माहितीनुसार अशा लोकांची संख्या सुमारे 6-7 हजार असू शकते. यासह संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना कालपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी केली जाईल, ती नकारात्मक आल्यावर त्यांना सोडण्यात येईल.