Eknath Khadse Joins BJP: एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार, भाजप प्रवेश झाला निश्चित
Eknath Khadse (File Image)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासारख्या दिग्गज नेत्यानेदेखील भविष्यकालीन राजकीय सोय लक्षात घेऊन भाजपत (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर आता सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हेदेखील भाजपत प्रवेश करणार आहेत. खुद्द खडसे यांनी तशी माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपत जाणार असे सांगितले जात होते. पडद्यामागे तशा हालचालीदेखील होत होत्या. एकनाथ खडसे हे 2014 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतु पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे नाराज झालेले खडसे विरुद्ध फडणवीस, असा संघर्ष सुरु झाला. पुढे त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले. पक्षांतर्गत हेटाळणीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (हेही वाचा - Mangaldas Bandal: फडणवीसांसोबत बैठकीला जाणं भोवलं, मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी वंचितने केली रद्द)

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा फेब्रुवारी महिन्यापासून चालू होती. यावर सर्वप्रथम त्यांचे राजकीय विरोधक तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीच विधान केले होते. खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं महाजन म्हणाले होते. एकनाथ खडसे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रातील भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती, असे वृत्त 3 एप्रिल रोजी समोर आले होते. मात्र हे वृत्त खडसे यांनी फेटाळले होते. दिल्लीमध्ये गेल्यावर अनेकांशी भेटीगाठी होतात, मात्र मी दिल्लीला गेलेलो असताना यावेळी कोणाचीही भेट झालेली नाही, असे खडसे म्हणाले होते.

आज म्हणजेच 6 एप्रिल रोजी त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार आहे. ते भाजपत जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांना काय जबाबदारी मिळणार, हे अद्याप स्षष्ट झालेले नाही. खडसे यांची भाजपत आगामी काळातील भूमिका काय असेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.