NCP | Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) पाठिंबा देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्ष उत्सुक आहेत. बसपची (BSP) भूमिका अद्यापही पुढे आली नाही. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस यांच्यातील जवळीक वाढती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उत्तर प्रदेशमध्ये घेतली जाणारी भूमिका महत्त्वाची आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज (7 डिसेंबर) भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, प्रदीर्घ काळानंतर राहुल गांधी यांच्यासोबत एक दीर्घ राजकीय भेट झाली. या भेटीबाबत विचारताना आगामी काळात शिवसेना युपीएमध्ये असेल का? असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. दरम्यान, काँग्रेस हीच सर्व पक्षांना घेऊन एकत्र येऊ शकते. सर्वांनी एकत्र येऊन एकच फ्रंट तयार करावी. दुसरी, तीसरी फ्रंट करण्याचा प्रयत्न केला तर पर्याय देता येऊ शकणार नाही. जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रमही तयार होत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. (हेही वाचा, Shiv Sena in UPA: शिवसेना लवकरच यूपीएचा घटक पक्ष? संजय राऊत लवकरच राहुल, प्रियंका गांधी यांना भेटण्याची शक्यता)

ट्विट

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या वाढत्या जवळकीबद्दल प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारले असता प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, ते (शिवसेना-काँग्रेस) एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. विरोधकांची एकच आघाडी असेल. सर्व विरोधी पक्षांनी भाजपच्या विरोधात उभे राहावे अशी आमची (राष्ट्रवादी) इच्छा आहे. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले तर आमचे नेते त्यांना (सर्व विरोधी पक्ष) एकत्र आणू शकतात. यूपीमध्ये आमचा समाजवादी पक्षाला पाठिंबा असणार आहे.