Shiv Sena in UPA: शिवसेना लवकरच यूपीएचा घटक पक्ष? संजय राऊत लवकरच राहुल, प्रियंका गांधी यांना भेटण्याची शक्यता
Shiv Sena | (File Photo)

महाविकासआघाडी (MVA) सरकारतर्फे सत्तेत असलेली शिवसेना (Shivsena) लवकरच संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थातच यूपीए (UPA) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात या जर्चा जोरदार सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) लवकरच राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक 2019 नंतर शिवसेना एनडीएतून (NDA) बाहेर पडली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मदतीने महाविकासआघाडीच्या रुपात शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आली. एनडीएतूनही बाहेर पडली. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीएत सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे राहुल गांधी यांना मंगळवारी आणि प्रियंका गांधी यांना बुधवारी भेटण्याची शक्यता आहे. शिवसेना युपीएमध्ये सहभागी झाल्यास उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब आदी राज्यांमध्ये काँग्रेसला सहकार्य करण्याची शक्यता आहे. (Anandrao Adsul Pre-Arrest Bail Reject: मुंबई उच्च न्यायालयाकडून शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव व्ही अडसूळांचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी युपीए कुठे आहे असा सवाल केला होता. यावर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, शिवसेनेने म्हटले होते की, केंद्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. भाजपला पर्याय द्यायचा तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच तो देता येऊ शकतो. काँग्रेसला वगळून युपीएचा विचार करणेही अशक्य असल्याचेही शिवसेनेने म्हटले होते.