छतरपूर येथील जटाशंकर धाम (Jatashankar Dham in Chhatarpur) येथील प्रसिद्ध तीन डोळे आणि तीन शिंगांचे नंदी महाराज (Nandi Maharaj -Bull) यांना शुक्रवारी निरोप देण्यात आला. हिंदू रितीरीवाजानुसार वैदिक विधी आणि मंत्रोच्चारांसह त्याला अंत्यसंस्कारपूर्वक समाधी देण्यात आली. भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या नंदीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बुंदेलखंड, विंध्य, माळवा ते उत्तर प्रदेशातून भाविक आले होते. तीन डोळे, तीन शिंगे असलेल्या या नंदीबद्दल स्थानिक आणि भाविकांमध्ये मोठा आदर होता. त्यामुळे नदीच्या स्मरणार्थ स्थानिक बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती. नंदीचा निवास मंदिराच्या आवारात होता. त्यामुळे त्याच आवारात सुमारे 5 बाय 8 फूट लांब आण 6 फूट खोल खड्ड्यात नंदीला पूरण्यात आले.
दरम्यान, नंदीनिधनानंतर नंदीच्या स्मरणार्थ, मंदिर समिती आता सुमारे दोन लाख रुपये खर्चून त्याची प्रतिमा येथे बसवणार आहे. येथे नंदी मंदिरही बांधले जाणार आहे. हे कदाचित या प्रदेशातील आणि देशातील हे पहिले नंदी मंदिर असेल. (हेही वाचा, Jyotiba’s horse Dies: दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मानाच्या अश्वाचा मृत्यू, दहा वर्षांच्या सेवेनंतर घेतला अखेरचा श्वास)
लोकन्यास धामचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, श्री जटाशंकर धामचे प्रसिद्ध तीन डोळे आणि तीन शिंगांचे नंदीबाबा यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. शुक्रवारी सकाळी पंडित खिलानंद गौतम आणि प्रदीप शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली पाच आचार्यांनी नामजप करून नंदीचा समाधी सोहळा पार पाडला. श्रद्धेचे केंद्र असलेल्या नंदी महाराजांचा नामजप करून अंतिम निरोप देण्यात आला.
तीन डोळे आणि तीन शिंगांचा हा नंदी 15 वर्षांपूर्वी वयाच्या 6 व्या वर्षी भटकत असताना योगायोगाने श्री जटाशंकर धाम येथे आला. तेव्हापासून तो येथे राहत होता. भक्तांमध्ये प्रसिद्ध असल्याने मंदिर व्यवस्थापनाने त्याची व्यवस्था मंदिराच्या आवारातच केली होती. कपाळावर तिसरा डोळा आणि तीन शिंगांची खूण असल्याने तो भाविकांमध्ये आकर्षणाचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू राहिला आहे. येथे आल्यानंतर तब्बल 21 वर्षांनी या नंदीचा मृत्यू झाला.