तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू झाल्याचे स्मरण म्हणून, उद्या म्हणजेच एक ऑगस्ट 2021 हा दिवस देशभरात ‘मुस्लीम महिला हक्क दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "केंद्र सरकारने 1 ऑगस्ट 2019 रोजी देशात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे तिहेरी तलाक ही सामाजिक कुप्रथा आता फौजदारी गुन्हा समजला जातो.
हा कायदा लागू झाल्यापासून देशात, तिहेरी तलाक च्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. देशभरातील मुस्लीम महिलांनी या कायद्याचे स्वागत केले आहे. देशातील विविध संघटना 1 ऑगस्ट हा दिवस “मुस्लीम महिला हक्क दिवस” साजरा करणार आहेत.
या दिनानिमित्त, मुख्तार अब्बास नकवी, महिला आणि बालविकास मंत्री स्मृति इराणी आणि वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात सहभागी होतील.
केंद्र सरकारने देशातील मुस्लीम महिलांमधील आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता अधिक दृढ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. तसेच, तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू करुन या महिलांच्या वैधानिक, मूलभूत आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण केले आहे.