
अरुंधती रॉय (Arundhati Roy), कुणाल कामरा, पूजा भट्ट आणि कल्की कोचेलिन यांच्यासह शंभरहून अधिक कलाकार आणि लेखक यांनी कॉमेडियन मुनावर फारुकी (Munawar Faruqui) ला पाठींबा दर्शवला आहे. मुनावर आणि इतर चार जणांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाबाबतचे सर्व गुन्हे पूर्णपणे मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. जानेवारीमध्ये इंदूरमधील एका कॅफेमधील विनोदी कार्यक्रमाबाबत भाजपा आमदाराच्या मुलाने तक्रार नोंदवली होती. कार्यक्रमात हिंदू देवता आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाष्य केले गेले असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फारुकीसह चार जणांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी रात्री इंदूर मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका झाली.
आता संयुक्त निवेदन जारी करत 100 पेक्षा जास्त कलाकारांनी फारुकी, नलिन यादव, प्रखर व्यास, एडविन अँथनी आणि सदाकत खान यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण भारतातील स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्कांवर गदा आणत आहे याकडे लक्ष वेधत, ते म्हणाले की फारुकीला ताब्यात घेणे किंवा त्याला अटक करणे हे देशातील सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कमकुवत सुरक्षेचे संकेत देते. भारतातील प्रत्येक नागरिकास योग्य सीमांसह अभिव्यक्तीचा अधिकार आहे. (हेही वाचा: Munawar Faruqui Booked in Indore: कॉमेडी शोमध्ये हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी; कॉमेडियन मुनावर फारुकी आणि इतर चौघांवर गुन्हा दाखल)
ते पुढे म्हणाले, ‘मात्र कलाकारांची सेन्सॉरशिपखाली केलेली अटक ही ठरवून केली असल्याचा अनेक घटना दिसून आल्या आहेत. या घटना देशातील कलात्मक आणि सर्जनशील स्वातंत्र्यासाठी हानिकारक आहे.’ हे निवेदन भारतीय डायस्पोरा समूहाचे 'प्रोग्रेसिव्ह इंडिया कलेक्टिव' यांच्या नेतृत्वात, 'पेन अमेरिकेच्या आर्टिस्ट अॅट रिस्क कनेक्शन', 'फ्रीम्युज' आणि 'रिक्लेमिंग इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने रिलीज झाले आहे.
दरम्यान, भाजपच्या स्थानिक आमदार मालिनी लक्ष्मणसिंग गौर यांचा मुलगा एकलव्य सिंह गौर याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.