Munawar Faruqui (संग्रहित संपादित प्रतिमा)

इंदूर (Indore) येथे भाजप आमदाराच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईस्थित कॉमेडियन मुनावर फारुकी (Munawar Faruqui) आणि इतर चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. शहरातील कॉमेडी शोमध्ये हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरूद्ध अपमानकारक शब्द वापरल्याचा आरोप आमदाराच्या मुलाने केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहरातील 56 दुकान परिसरातील कॅफेमध्ये कॉमेडी शो आयोजित करण्यात आला होता. यात भाजपच्या स्थानिक आमदार मालिनी लक्ष्मणसिंग गौर यांचा मुलगा एकलव्य सिंह गौर (36) आपल्या सहकाऱ्यांसह प्रेक्षक म्हणून पोहोचले. त्यावेळी कार्यक्रमात काही टिप्पण्या केल्या गेल्या. त्याचा निषेध म्हणून कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला आणि कार्यक्रम थांबवला.

तुकोगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी कमलेश शर्मा यांनी शनिवारी सांगितले की, मूळ गुजरातमधील जुनागडचा विनोदकार मुनावर फारुकी आणि चार स्थानिकांविरोधात शुक्रवारी रात्री उशिरा, एकलव्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. व्हिडिओ फुटेजवरून हा गुन्हा दाखल केला गेला व या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एकलव्य यांनी माध्यमांना सांगितले की, ‘मी आणि माझे काही सहकारी तिकीट विकत घेऊन या कॉमेडी शोमध्ये पोहोचलो, तिथे फारुकी मुख्य कॉमेडियन कार्यक्रम सादर करत होता. या शोमध्ये अपमानकारक कमेंट्स करत हिंदू देवी-देवतांची चेष्टा केली जात होती. कार्यक्रमात गोध्रा घटनेचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही अयोग्य उल्लेख केला गेला. अशाप्रकारे शोमध्ये आक्षेपार्ह गोष्टी कॉमेडीच्या रूपाने सुरू होत्या. आम्ही त्याचा व्हिडिओ बनविला आणि कार्यक्रम थांबविला तसेच प्रेक्षकांना कॅफेच्या बाहेर काढले. त्यानंतर आम्ही या कार्यक्रमाचे विनोदी कलाकार आणि संयोजकांना पकडून तुकोगंज पोलिस ठाण्यात नेले.’ (हेही वाचा: प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण)

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वेळी प्रशासनाच्या परवानगीशिवाय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि कॅफेच्या छोट्याशा सभागृहात सामाजिक अंतर न पाळता किमान 100 प्रेक्षक बसले असल्याचा आरोपही भाजपच्या आमदाराच्या मुलाने केला आहे. दरम्यान, एकलव्य 'हिंदू रक्षक' या स्थानिक संस्थेचे संयोजक आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की कॅफेमध्ये गदारोळ सुरू असताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कॉमेडियनला मारहाणही केली पण एकलव्यने हा आरोप नाकारला.