Dilip Chhabria (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांनी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार डिझायनर आणि कार मॉडिफिकेशन स्टुडिओ 'डीसी डिझाईन' चे संस्थापक दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर मल्टीपल कार रजिस्ट्रेशन रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याकडे असलेली सुमारे 75 लाख रुपये किंमतीची हाय एंड स्पोर्ट्स कारही पोलिसांनी जप्त केली. दिलीप छाब्रियाविरोधात भादंवि कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाब्रिया यांना 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मंगळवारी पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले की, प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया एकाच नंबरची नोंदणी व चेसिस नंबर असलेली अनेक वाहने बनवित होता. एवढेच नव्हे अनेक NBFC बँकांकडून तो ग्राहक म्हणून स्वत: च्या गाड्याही खरेदी करीत होता. त्यानंतर या गाड्या थर्ड पार्टीला विकल्या जात असे. आतापर्यंत अशा 127 वाहनांची विक्री झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यापैकी सुमारे 90 वाहनांचा शोध सुरू आहे. वाहनांमध्ये बसवलेल्या इम्पोर्टेड इंजिनांचीही तपासणी केली जात आहे. अशी इंजिने खरेदी करतानाचा कर वाचविण्यासाठी हे सर्व केले गेले आहे का, याचा तपासा केला जात आहे. जीएसटी व इतर कर वाचविण्यासाठी हे सर्व केले गेले असावे असा गुन्हे शाखेला संशय आहे. (हेही वाचा: कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती SL Dharmegowda यांची आत्महत्या, सुसाईड नोटसह रेल्वे ट्रकवर आढळला मृतदेह)

मुंबई गुन्हे शाखेचे संयुक्त सीपी मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, भारताची पहिली स्पोर्ट्स कार डीसी अवंती यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक गाडी ताज हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती,  जेव्हा हे वाहन पकडले गेले, तेव्हा त्याच नंबरची गाडी तामिळनाडू आणि हरियाणामध्येही आढळली. त्यानंतर तपास सुरू झाला तेव्हा लक्षात आले की, डीसी डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने समान इंजिन क्रमांक आणि चेसिस नंबर असलेली वाहने अनेकांना विकली आहेत. कंपनीने 127 वाहने तयार केली आहेत. त्यापैकी 90 ची. विक्री झाली आहे.

विशेष गोष्ट म्हणजे, ज्या कंपनीने वाहन विकले आहे त्यांनीच नंतर पुन्हा ते वाहन खरेदी केले आहे. या बाबत बर्‍याच बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कर्ज घेण्याबाबतही चर्चा आहे.