Mumbai Water Supply: मुंबईतील पाणीकपातीचा निर्णय रद्द, महापालिकेतर्फे मुंबईकरांना मोठा दिलासा
Tulsi Lake | (Photo Credits: ANI)

दरवर्षी पावसाची जूनमधील सरासरी महिन्याच्या अखेरपर्यंत भरून निघते. यंदा जूनमध्ये पावसाने साथ न दिल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्याचे आव्हान पालिकेसमोर होते.  म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलैच्या महिन्याच्या सुरवातीपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आणि आवश्यक तेवढा जलसाठा उपलब्ध झाल्याने 8 जुलैपासून पाणीपुरवठ्यातील 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाने रद्द केला आहे.

 

यंदा जूनमध्ये मुंबईसह आजुबाजुच्या भागात पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्याचे आव्हान पालिकेसमोर होते. त्यामुळे पालिकेने पाणी जपून वापरण्याचे तसेच पाण्याची नासाडी न करता १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्याभरापासून मुंबई, ठाण्यासह इतर भागांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुंबईला आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करणं आता पालिकेसाठी शक्य आहे.  (हे ही वाचा:-Mumbai Rain Update: मुंबईत रेड अलर्ट जारी केल्याने प्रवासाचे नियोजन करण्याचे BMC चे आवाहन)

 

मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी एकूण जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका आहे. सात जलाशय मिळून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, त्या तुलनेत जून महिन्यात या जलाशयात 1 लाख 31 हजार 770 दशलक्ष लिटर एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. मात्र, आता 2 लाख 75 हजार 514 दशलक्ष लिटर एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द केला आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.