CR | Pixabay

मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल (Mumbai Local) वर यंदाच्या रविवारी 19 मार्चला मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक असणार आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मात्र रविवारच्या दिवसा ब्लॉक मधून दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे या रविवारी तुम्ही बाहेर पडण्याचं प्लॅनिंग करत असाल तर या मेगा ब्लॉक, जम्बो ब्लॉकच्या वेळा देखील नक्की पाहून प्लॅनिंग करा. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदर या मार्गावर शनिवार-रविवारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. या वेळात काही लोकल रद्द होणार आहेत तर काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक कधी, कुठे?

सीएसएमटी ते विद्याविहार या स्टेशन दरम्यान 19 मार्चला अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.55 ते 3.55 या वेळेत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून चालवल्या जातील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा ब्लॉक नसेल पण शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 4.55 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक मध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावरील फेर्‍या स्लो ट्रॅक वर चालवल्या जातील. या दरम्यानही काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

कुर्ला स्थानकामध्ये गर्डरप्लेट टाकण्याचं काम होणार असल्याने शनिवार रात्री 11.50 ते रविवार पहाटे 4.30 पर्यंत विक्रोळी ते माटुंगा अप जलद आणि वडाळा रोड ते मानखुर्द डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाईल.

काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास देखील प्रभावित होणार आहे. यामध्ये 11020 कोणार्क एक्सप्रेस, 12810 हावडा मुंबई मेल, 12134 मंगळूरू-मुंबई एक्सप्रेस आणि 12702 हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्सप्रेस मुलुंड ते माटुंगादरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील ज्यामुळे त्या 15 मिनिटं उशिराने धावतील.