प्रवाशांच्या सेवेसाठी आता दररोज राजधानी एक्स्प्रेस (Rajdhani Express) धावणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) राजधानीसाठी आणखी एक रेक उपलब्ध होणार असून लवकरच मुंबई-नाशिक-दिल्ली मार्गे राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. मार्चअखेरपर्यंत दररोज राजधानी एक्स्प्रेस मुंबई ते दिल्ली असा प्रवास करेल.
मध्य रेल्वेमार्गावरुन पहिली राजधानी एक्स्प्रेस 19 जानेवारी रोजी धावली होती. पहिल्याच दिवशी राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजधानी एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवण्याच्या सूचना मध्य रेल्वेला दिल्या. त्यामुळे राजधानीसाठी 21 डबे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून हे डबे दोन टप्प्यांत मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील.
राजधानी एक्स्प्रेसमधील सुविधा
# मोफत वायफाय- वायफाय नेटवर्कवर रजिस्ट्रेशन करुन प्री-लोडेड सुविधांचा मोबाईल, लॅपटॉपवर वापर करता येईल.
# 3 डी हेडसेट- रेल्वेच्या हेरीटेज स्थळांची व्हिडिओ क्लिप पाहण्यासाठी 3 डी हेडसेट देण्यात येतील. प्रवासादरम्यान तुम्ही हे हेडसेट वापरु शकता.
# 'आपकी राय' मोबाईल अॅप- या अॅपद्वारे प्रवासी सूचना, तक्रारी ऑनलाईन नोंदवू शकतात. त्याचबरोबर प्रवाशांचा एक्स्प्रेसमधील कर्मचाऱ्यांना या अॅपद्वारे प्रवाशांचा प्रतिसादही जाणून घेता येईल.
आता प्रत्येक शनिवार आणि बुधवारी राजधानी एक्स्प्रेस मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी उपलब्ध होत आहे. तर मंगळवारी आणि रविवारी राजधानी एक्स्प्रेस दिल्लीहून मुंबईच्या दिशेला रवाना होणार आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद पाहता मार्चअखेरपर्यंत राजधानी एक्स्प्रेस रोज मुंबई-दिल्ली असा प्रवास करेल.