मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आता नाशिकमार्गे धावणार , मध्य रेल्वेवर धावणारी पहिली राजधानी एक्सप्रेस
Representational Image | Indian Railways (Photo Credits: ANI)

Mumbai - Delhi Rajdhani Express via Nashik: मुंबई दिल्ली प्रवास शाही आणि वेगवान करणारी करणारी राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express)  आता नाशिकमार्गे महाराष्ट्रात धावणार आहे. लवकरच मुंबई -दिल्ली मार्गावर(Mumbai - Delhi)  नवी राजधानी एक्सप्रेस सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी एक्स्प्रेस अशी राजधानी एक्सप्रेसची ओळख आहे. आता नाशिकमार्गे (Nashik) राजधानी एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्याने मध्य रेल्वेवरून (Central Railway) धावणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस असेल.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा विस्तार नाशिकपर्यंत करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली होती. मात्र बुलेट ट्रेनची मागणी फेटाळली असली तरीही महाराष्ट्राला लवकरच नवी राजधानी एक्स्प्रेस मिळणार आहे. मुंबई सोबतच नाशिक, धुळे, जळगाव या भागांमधील प्रवासीदेखील आता राजधानी एक्सप्रेसने प्रवास करू शकणार आहेत.

कसा असेल नव्या राजधानी एक्सप्रेसचा प्रवास ?

मुंबई -दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुमारे 15-17  तास प्रवास करायची. आता नाशिकमार्गे दिल्लीला पोहचण्यासाठी 20 तासांचा वेळ लागणार आहे. नवी 'राजधानी एक्सप्रेस ' मुंबई, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, भोपाळ, ग्वालियर जंक्शन, दिल्ली किंवा मुंबई, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, भोपाळ, झांसी जंक्शन, ग्वालियर जंक्शन, आग्रा आणि दिल्ली या स्थानकांवर थांबण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.