Mulayam Singh Yadav Funeral: मुलायम सिंह यादव पंचतत्वात विलीन, समाजवादी पक्षाचे नेते, पूत्र अखिलेश यादव यांनी दिला मुखाग्नी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ( Former Uttar Pradesh CM) आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) पंचतत्वात विलीन झाले. मुलायम सिंह यांच्यावर सैफई (Saifai) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Mulayam Singh Yadav Funeral) मंगळवारी (11 ऑक्टोबर) करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थीत होते. त्यांनी साश्रुपूर्ण नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बाबा रामदेव यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर या अंत्यसंस्कारांस उपस्थित होते.

मुलायमसिंह यादव यांना त्यांचे पूत्र तथा समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव यांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी सैफई येथे मुखाग्नी दिला. या वेळी 'मुलायम सिंह यादव अमर रहे', 'देस का नेता कैसा हो, मुलायम यादव जैसा हो', 'नेताजी अमर रहे' यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुलायम सिंह यादव यांच्यावर त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांच्या स्मारकाजवळील मंचावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह सैफई येथे दाखल झाले. या वेळी राजनाथ सिंह म्हणाले, 'पंतप्रधान मोदी येथे येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी मला आदरांजली वाहण्यास पाठविले आहे. आमचे खूप घट्ट नाते होते. मुलायमसिंह यादव हे भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहोत.'

सपा सुप्रीमो मुलायम सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि जया बच्चन हे देखील उत्तर प्रदेशातील सैफई येथे पोहोचले. खासदार वरुण गांधी यांनी सैफईला भेट देऊन मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य, ब्रिजेश पाठक, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते कमलनाथ आदी उपस्थित होते. इतरही सर्वपक्षीय नेते मोठ्या प्रमाणावर सौफोई येथे उपस्थित होते.