
MPSC November Exam 2020 Postponed: सध्याच्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात देशाचे आर्थिक नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचेही मोठे नुकसान झाले आहे. या महामारीच्या काळात शाळा-कॉलेजेस बंद आहेत व अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) या परीक्षा घेतल्या जातात. याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
परिपत्रकामध्ये म्हटले आहे, ‘दिनांक 1 नोव्हेंबर, 2020 व दिनांक 22 नोव्हेंबर, 2020 रोजी नियोजित अनुक्रमे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात येत आहेत. प्रस्तुत परीक्षांचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.’ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षापूर्व सहसचिव यांनी ही माहिती दिली आहे. (हेही वाचा: एमपीएससी परिक्षेबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर संभाजीराजे, राजेश क्षीरसागर, जयंत पाटील यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)
दरम्यान याआधी 9 ऑक्टोबर रोजी, मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचे तापले होते. एमपीएससीच्या परीक्षा तात्काळ रद्द करावी, असी मागणी मराठा संघटनाकडूव करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. महाराष्ट्रात 200 पेक्षा अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. या परीक्षा एप्रिल/मे 2020 मध्ये होणार होत्या मात्र कोरोनामुळे या परीक्षा आतापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अजून वेळ मिळणार आहे.