MP Shocker: शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून 7 आदिवासी विद्यार्थिनींवर बलात्कार; व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून मुलींना फसवले
Rape प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi) जिल्ह्यातून बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी गेल्या पाच महिन्यांत 7 आदिवासी मुलींवर बलात्कार करण्यात आला आहे. यातील 5 पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तर दोन पीडित मुलींची ओळख अद्याप पटलेली नाही. जानेवारी ते मे दरम्यान या 7 मुलींवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. आरोपी आवाज बदलून मुलींना फसवायचे आणि नंतर निर्जन ठिकाणी बलात्कार करायचे. आरोपींनी स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे.

महत्वाचे म्हणजे मुलींना फसवण्यासाठी ते व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करत असता. या ॲपच्या मदतीने ते मुलींच्या महिला शिक्षिका असल्याचे भासवत व  मुलींना शिष्यवृत्ती देण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांच्यावर बलात्कार करायचे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी ब्रिजेश प्रजापती, साथीदार राहुल प्रजापती आणि संदीप प्रजापती यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आणि त्याच्या मित्रांनी सरकारी महाविद्यालय, सीधीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काही विद्यार्थिनींचे नंबर मिळवले. त्यानंतर या मॅजिक व्हॉईस ॲपच्या माध्यमातून मुलींना कॉल करण्यास सुरुवात केली. कॉलवर ते आपण रंजना मॅडम असल्याचे भासवायचे. त्यानंतर शिष्यवृत्तीच्या बहाण्याने मुलींना निर्जन स्थळी बोलावले जायचे. मुलींचा विश्वास बसावा म्हणून, त्यांना येताना शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रेही घेऊन यायला सांगितली जायची.

याचा सुगावा लागू नये म्हणून, एका तरुणाला दुचाकीवरून मुलींना आणण्यास पाठवले जायचे. त्यानंतर मुलींवर बलात्कार केला जायचा. आरोपींनी आतापर्यंत 7 विद्यार्थिनींना आपला बळी बनवले असून, ही संख्या आणखी वाढू शकते असा संशय व्यक्त केला जात आहे. यातील मुख्य आरोपी ब्रिजेश प्रजापती हा व्यवसायाने मजूर आहे. यूट्यूबवरून व्हॉइस चेंजिंग ॲप्सच्या मदतीने तो आवाज बदलायला शिकला. (हेही वाचा: Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशात 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, धमकी देत पालकांकडून मागितली खंडणी)

पहा कमलनाथ यांची पोस्ट-

दरम्यान, या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. आदिवासींच्या असुरक्षिततेबाबत त्यांनी मोहन सरकारवर निशाणा साधला आहे. कमलनाथ यांनी पीडित विद्यार्थिनींना आर्थिक मदत, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आदिवासी मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष चाचणी दल स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.