बिहार मध्ये चमकी तापामुळे 150 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू; 7 दिवसांत उत्तर देण्याचे राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचे आदेश
The Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

बिहार (Bihar) येथील मुजफ्फरपूरमध्ये 150 पेक्षा अधिक मुलांचा चमकी तापाने (Acute Encephalitis Syndrome) मृत्यू झाला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारला याबाबत सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत्र. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने बिहार सरकारला राज्यातील वैद्यकीय सुविधा, पोषण व स्वच्छता याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी फक्त बिहारमध्ये चमकी तापाने थैमान घातले होते, मात्र आता हा ताप उत्तरप्रदेशकडेही सरकार असल्याचे दिसत आहे.

या घटनेची सुनावणी आता 10 दिवसांनतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेमध्ये मागणी केली गेली होती की, न्यायालयाने बिहार सरकारला राज्यातील वैद्यकीय सोयी सुविधा वाढवण्याचे आदेश द्यावेत. सोबतच इतक्या मोठ्या घटनेबाबत केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलावीत अशी इच्छा व्यक्त केली गेली होती. मनोहर प्रताप आणि सनप्रीत सिंह यांनी सादर केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, सरकारी यंत्रणा या तापाचा सामना करण्यात पूर्णतः अपयशी ठरली आहे. (हेही वाचा: बिहारमध्ये 'चमकी' तापाचे थैमान; औषध शोधून काढण्यात डॉक्टर अपयशी)

चमकी तापाला मराठीमध्ये मेंदूज्वर असेही संबोधले जाते. हा आजाराची अस्वच्छतेतून निर्माण होणारे आणि पसरणारे विषाणू, लिची फळाचा आहारात अनुचित समावेश, उष्माघात ही काही कारणे सांगितली जात आहेत. या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसींबाबत जागरूकता न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या एक महिन्यापासून चमकी तापाची साथ पसरली आहे. या तापाचा सर्वात जास्त प्रभाव मजफ्फरपुर येथे दिसून येत आहे. येथील एकट्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अँन्ड हॉस्पिटल मध्ये आतापर्यंत 175 मुलांचा मृत्यू झाला आहे तर, 525 मुले या तापाने ग्रस्त आहेत.