New Chief Minister of Madhya Pradesh: मध्य प्रदेश राज्यात भाजपने भाकरी फिरवली आहे. बहुमताने सत्तेत येताच मामा शिवराज सिंह चौहाण (Shivraj Singh Chouhan) यांचा पत्ता कट करत मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. उज्जैन दक्षिणचे आमदार मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावावर शिक्कामर्तब करत पक्षाने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपने छत्तीसगड राज्यातही मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा दिला आहे. पक्षाने तेच सूत्र मध्यप्रदेश राज्यातही राबवलेले दिसते. दरम्यान, शिवराज सिंह हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार राहिले होते. पाठीमागील सलग तीन टर्म त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याची संधी मिळाली होती. मात्र, या वेळच्या निवडणुकीत मतदार आणि भजप नेतृत्व यांच्या मनात त्यांच्याबद्दल काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. त्याचाच परिणाम म्हणून चौहाण यांना मुख्यमंत्री पदापासून भाजपने दूर ठेवल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री पदावर नवा चेहरा

राजकीय वर्तुळामध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आज म्हणजेच 11 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा केली जाईल अशी चर्चा होती. ती चर्चा खरी ठरली असून मध्य प्रदेशला मुख्यमंत्री पदावर नवा चेहरा मिळाला आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविण्यासाठी भाजप निरिक्षकांचे एक मंडळ मध्य प्रदेशमध्ये दाखल झाले होते. ज्यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपचे तीन केंद्रीय निरीक्षक एका बैठकीत भाग घेण्यासाठी भोपाळला पोहोचले होते. (हेही वाचा, Chhattisgarh New CM: भाजपचे आदिवासी नेते Vishnu Deo Sai यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी निवड)

बड्या चेहऱ्यांना धक्का

प्रदीर्घ काळ मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर राहिलेले शिवराज सिंह चौहाण तसेच, प्रल्हाद पटेल, नवनिर्वाचित आमदार नरेंद्र तोमर, इंदूर हेवीवेट कैलाश विजयवर्गीय, राज्य युनिटचे प्रमुख व्हीडी शर्मा आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया याचे प्रमुख दावेदार असलेले चेहरे बाजूला करुन पक्षाने यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. (हेही वाचा - Telangana Govt Mahalaxmi Scheme: सार्वजनिक वाहतूक सेवेत महिलांना मोफत प्रवास, आरोग्य विमा कवच योजना मर्यादेतही 10 लाख रुपयांपर्यंतची वाढ; सत्तेत येताच काँग्रेस सरकारचा तेलंगणात महत्त्वपूर्ण निर्णय)

भारतीय जनता पक्षाने (भाजप) 17 नोव्हेंबरच्या मतदानानंतर मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवली, 230 सदस्यांच्या विधानसभेत 163 जागा जिंकून काँग्रेसला 66 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर सोडले. त्यामुळे सहाजिकच या वेळी मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली होती.

एक्स पोस्ट

राजस्थानमध्ये तिढा कायम

दरम्यान, भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवला असला तरी राजस्थानमधील तिढा अद्यापही कायम आहे. राजस्थानमध्येही मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजे यांचे नाव चर्चेत आहे. वसुंधरा राजे यांनी उघडपणे काहीच भाष्य केले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपला दावा मात्र कायम ठेवला आहे.