जर का आपण 15 डिसेंबरपासून राष्ट्रीय टोल प्लाझावरुन जायचा विचार करत असाल, तर आपल्याला गाडीवर फास्टॅग (FASTag) लावणे गरजेचे आहे. जर आपण आपल्या कारमध्ये फास्टॅग बसविला नसेल आणि आपण टोल प्लाझावरुन गेलात तर तुम्हाला दुप्पट शुल्क द्यावे लागेल, परंतु ज्यांनी आपल्या कारमध्ये अद्याप फास्टॅग बसविला नाही त्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अशा लोकांना सरकारने 1 महिन्याचा दिलासा दिला आहे. म्हणजे 15 जानेवारीपर्यंत ते टोल प्लाझावर रोख पैशांच्या स्वरूपात (Cash Payment) टोल भरू शकतील.
15 डिसेंबरपासून टोल प्लाझावरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग सक्तीचे करण्यात आले होते, परंतु शासनाने यामध्ये येणार्या अडचणी कमी करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझाच्या एक चतुर्थांश फास्टॅग लेनला एक महिन्यासाठी हायब्रिड लेन बनविण्यात आले आहे. म्हणजेच या हायब्रिडमधून जाणाऱ्या गाड्या येत्या 15 जानेवारीपर्यंत टोलवर पैशांच्या स्वरूपात पेमेंट करू शकतात. अशाप्रकारे सरकारने लोकांना 30 दिवसांसाठी दिलासा दिला आहे.
25 टक्के फास्टॅग लेन 15 जानेवारीपर्यंत हायब्रीड लेनमध्ये राहतील, परंतु त्यानंतर टोल प्लाझामधील सर्व लेन फास्टॅग लेन बनवल्या जातील. ही तात्पुरती व्यवस्था केवळ 30 दिवसांसाठी परिवहन मंत्रालयाने मंजूर केली आहे. जेणेकरून या काळात लोक त्यांच्या गाड्यांवर फास्टॅग बसवतील. लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे. (हेही वाचा: बदलत आहेत बँक, रेस्ते आणि टेलिकॉम क्षेत्रातील नियम; Fastag, NEFT व Portability संदर्भात घ्या जाणून)
टोल प्लाझावरील लांबच्या लांब रांगा फास्टॅग प्रणालीद्वारे कमी केल्या जातील. टोल टॅक्स ऑनलाईन भरण्याच्या सोयीमुळे, कोणालाही रोख पैसे बाळगण्याची गरज भासणार नाही. याद्वारे टोल प्लाझावरील कागदाचा वापरही कमी केला जाईल. टोल प्लाझावर रांगा कमी झाल्याने प्रदूषणही कमी होईल असा विश्वास आहे. याशिवाय टोल टॅक्सवर सरकार अडीच टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर करत आहे. त्यामुळे येत्या 14 जानेवारीपर्यंत आपल्या गाड्यांवर फास्टॅग जरूर लावून घ्या.