Indian Black Money | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) नाही की कुठली लॉटरी नाही. अगदी कोणत्या एखाद्या मालमत्तेचा व्यवहार नाही की कोणतेही बक्षीस नाही. असे असूनही बिहारमधील दोन शाळकरी मुले चक्क करोडपती झाली आहेत. होय, आपण करोडपती झाल्याचे पाहून ही शाळकरी मुळे आणि त्यांचे कुटुंबीयही अवाक झाले आहेत. बिहार (Bihar) राज्यातील कटीहार (Katihar District) जिल्ह्यात असलेल्या भगौरा (Bagaura) येथील भगाप्रखंड पस्तिया (Pastiya ) गावात ही घटना घडली आहे. या गावातील आशीष आणि गुरुचरण विश्वास नामक या दोन मुलांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) च्या बँक खात्यावर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल अनुक्रमे 6 कोटी 20 लाख 11 हजार 100 रुपये (62021100.00) आणि 90 करोड़ 52 लाख 21 हजार 223 रुपये (905221223) जमा झाले आहेत. मुलांनी आपले अकाऊंट तपासल्यावर ही बाब त्यांच्या ध्यानात आली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनीही रक्कम तपासली असता खात्यावर इतकी रक्कम दिसत आहे. त्यामुळे गावातील इतरही उत्साही मंडळींनी आपापले खाते क्रमांक तपासण्यासाठी बँकेकडे धाव घेतली.

करोडपती मुलांबाबत माहिती मिळताच आजमनगर प्रखंड पस्तिया गावातील गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गावातील काही जाणकार मंडळींनी म्हटले आहे की, घटनेबाबत नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी एसबीआय (SBI) बँकेकडे संपर्क केला आहे. मात्र, बँकेतील अधिकाऱ्यांनी मात्र या दोन्ही मुलांच्या खात्यावर अशा प्रकारची कोणतीही रक्कम दिसली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कागदोपत्री करोडपती झालेल्या या मुलांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क केला. या मुलांनी सांगितले की आम्ही आमचे बँक खाते तपासले तेव्हा आम्ही आश्चर्यचकीत झालो. मग आम्ही आमच्या घरातल्यांना याबाबत माहिती दिली. घरातल्यांनीही खाते तपासून पाहिले तर त्यावर रक्कम दिसते आहे. दरम्यान, गावच्या प्रमुखांनीही याबाबत पुष्टी केली आहे. (हेही वाचा, PM Modi Sent Me Money: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले 5.50 लाख रुपये, नाही करणार परत; बिहार ग्रामीण बँकेच्या अजब खातेदाराची गजब कहाणी)

दरम्यान, असित कुमार नावाच्या एका विद्यार्थ्याला जेव्हा प्रसारमाध्यमांनी विचारले तेव्हा त्याने सांगितले की, आमच्या (विद्यार्थ्यांच्या) खात्यावर पुस्तक खरेदीसाठी काही रक्कम येते. मात्र ही रक्कम केवळ 500 रुपये इतकीच असते.

बिहार ग्रामीण बँकेच्या मानसीयेथील शाखेत एका इसमाच्या खात्यावर 5 लाख रुपये जमा झाल्याचे वृत्त नुकतेच आले होते. मात्र, या इसमाच्या खात्यावर जमा झालेले पैसे हे केवळ बँक कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने झाले होते. मात्र, या इसमाने हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पाठवल्याचे सांगत परत कराला नकार दिला. त्यानंतर बँकेने संबंधित इसमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या इसमास अटकही केली आहे.