Independence Day 2020: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी MHA कडून गाईडलाईन्स जारी
Independence Day 2020 Celebrations | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्यासंबंधित काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकांनी एकत्रित येणे टाळा. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करावा असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. देशातील सर्व सरकारी कार्यालये, राज्य यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने या सूचना जारी केल्या आहेत.

रिपोर्टनुसार, सहसचिव अनुज शर्मा यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना यासंबंधित पत्र लिहिले आहे. या पत्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावा यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यातील राजधानीमध्ये सकाळी 9 वाजता राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. पोलिस, मिलेट्री फोर्सेस, होम गार्ड, NCC यांच्या परेड होतील. परेडनंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होईल. कोविड-19 च्या संकट लक्षात घेता या कार्यक्रमात लोकांची गर्दी होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसंच मास्क घालणे, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना वॉरीअर्संना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात यावे असे नियमावलीत म्हटले आहे. तसंच कोरोनामुक्त झालेल्या काही व्यक्तींनाही या कार्यक्रमात सहभागी करुन घेता येईल, असेही गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. (भारतात मागील 24 तासांत कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झाली सर्वाधिक वाढ! 49,310 रुग्णांसह कोरोना संक्रमितांची संख्या 12,87,945 वर)

ANI Tweet:

तसंच कोरोना व्हायरसची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन यंदा दिल्लीतील लाल किल्ल्यात वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार नसून बसण्यासाठी सतरंजी ऐवजी खुर्च्यांचा वापर करण्यात येईल. तसंच यादिवशी पोलिसही पीपीई किट मध्ये दिसतील. तर राष्ट्रपती भवनात दुपारी होणाऱ्या कार्यक्रमात देशातील आरोग्य तज्ञांना आमंत्रित करण्यात आले असून कोरोना वॉरिअर्स या कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील.