IMD कडून उन्हाळी दीर्घकालीन पूर्वानुमान जाहीर; पहा कसा असेल यंदाचा उन्हाळा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

स्कायमेट पाठोपाठ आयएमडी (IMD) कडून आगामी उन्हाळी आणि पावसाळी ऋतूचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या उन्हाळी दिर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागाने काल (1 मार्च) दिवशी आपला अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये कोकण, घाट प्रदेश आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरींची शक्यता शास्त्रज्ञांनी बोलून दाखवली आहे.

कोकण आणि घाट प्रदेशात किमान तापमान हे सरासरीपेक्षा 65-75% अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता 35-65% अधिक आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा मध्ये हेच तापमान 35-55% अधिक आहे. हे देखील नक्की वाचा: Weather Alert : राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता, उन्हाळ्याची चाहूल.

हवामान अंदाज

किमान प्रमाणेच कमाल तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक असेल. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात 35-65% अधिक उष्णता असणार आहे. देशभरात मार्च महिन्यात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून, महाराष्ट्राचा दक्षिण भाग वगळता अन्य ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने मांडला आहे.

सध्या प्रशांत महासागरात ला निना स्थिती असून, तेथील तापमान वाढून उन्हाळ्यात न्यूट्रल स्थिती होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा मान्सून काळात 'एल निनो' तयार होण्याची शक्यता नाही. असे देखील सांगण्यात आले आहे.