Country Foods: ग्रामीण भागात पंचतारांकीत दर्जाचे अस्सल देशी पदार्थ बनवणाऱ्या युट्यूबर मस्तनम्मा यांचे निधन
Mastanamma | (Photo Credits: YouTube, Country Foods)

Mastanamma, World's Oldest Youtuber, Passes Away: जगातील सर्वात वृद्ध युट्यूबर मस्तनम्मा ( Mastanamma)यांचे निधन झाले आहे. त्या 107 वर्षांच्या होत्या. आंध्र प्रदेशातील गुनटूर गावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खास पद्धतीने रुचकर खाद्यपदार्थ बनवण्याच्या 'कुकिंग स्टाईल'मुळे त्यांनी अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यांचा विशेष असा चाहता वर्ग होता. मस्तनम्मा या युट्यूबवर Country Foods नावाचे चॅनल चालवत होत्या. ज्याचे १२ लाखहूनही अधिक सब्सक्राइबर्स होते. त्यांनी 2016मध्ये YouTube चॅनल सुरु केले. के लक्ष्मण नावाचा त्यांचा एक दोस्त होता. तो त्यांचा दुरचा नातेवाईक होता. मस्तनम्मा आणि के. लक्ष्मण यांनी वांग्याची भाजी बनवली. त्याचा व्हिडिओ आणि रेसिपी युट्युबवर अपलोड केली. रेसीपीच्या या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळाला की, या पहिल्यावहिल्या व्हिडिओला तब्बल 75 हजार व्ह्यूव मिळाले. त्यानंतर मस्तनम्मा यांनी वॉटरमिलन चिकन करी (watermelon chicken curry), कबाब (kebabs) आणि गावरान पद्धतीचे केएफसी चिकन (village style KFC chicken)बनवले. त्यांचे हे पदार्थ तर जगप्रसिद्ध झाले. त्यांना गेल्या वर्षी 106व्या वाढदिवसानिमित्त युट्यूबकडून पैसे मिळाले होते.

मस्तनम्माचा प्रत्येक व्हिडिओ युट्यूबवर प्रचंड व्हायरल झाला. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रेम केले. पण, असे असले तरी, मस्तनम्मा यांची संघर्ष कहाणी प्रचंड भावविवश करणारी आहे. त्यांचा बालविवाह झाला होता. वयाच्या आकराव्या वर्षी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न लाऊन दिले. वयाच्या २२व्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या पाच मुलांच्या आई होत्या. सध्या मात्र त्या पाच मुलांपैकी एकच जिवंत आहे. मुलांच्या पालनपोषणासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले.

प्रत्येक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवने हे मस्तनम्मा यांचे वैशिष्ट्य होते. त्यातही समुद्री पदार्थ हे त्यांच्या कुकिंग स्टाईलचे खास वेगळेपण. त्या गुनटुर नदी जवळ राहात. त्या ज्या पद्धतीचे पदार्थ बनवायच्या त्याचा स्वाद अतिशय उच्च दर्जाचा असे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या युट्यूब चॅनलवर एकही व्हिडिओ अपलोड झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सनाही काळजी वाटत होती. ते अधिरतेने त्यांच्या व्हिडिओची वाट पाहात होते.

मस्तनम्माच्या युट्युब चॅनलवर एक व्हिडिओ सोमवारी शेअर करण्यात आला. ज्यात त्यांचा जीवनपट दाखवण्यात आला होता. व्हिडिओच्या अखेरीस त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. ही बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला.