
मणिपूरमधील (Manipur) मैतेई समुदायाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात हिंसक निदर्शने (Violence) झाल्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. नुकतेच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी हिंसाचारानंतरच्या आतापर्यंतच्या घडामोडी आणि परिस्थितीवर एक निवेदन जारी केले आहे.
सीएम बिरेन सिंह म्हणाले की, जे लोक अजूनही हिंसाचारग्रस्त भागात अडकले आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी कबूल केले की अशा ठिकाणी अजूनही 10,000 लोक अडकले आहेत. यासोबतच बिरेन सिंह म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्या दिवसापासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारात बाधित कुटुंबांना भरपाई जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह इंफाळमध्ये मीडियाशी बोलताना म्हणाले, '3 मे रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेत 60 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात 231 लोक जखमी झाले असून 1700 घरे जाळली आहेत. मी राज्यातील जनतेला शांतता आणि सौहार्दाचे आवाहन करतो. जे अडकले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत 20,000 अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सुमारे 10,000 लोक अजूनही अडकलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटनेच्या दिवसापासून आजपर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी केंद्रीय दलाच्या अनेक तुकड्या पाठवल्या आहेत.’ (हेही वाचा: Kerala Boat Capsizes: केरळ मध्ये डबल डेकर बोट उलटल्याच्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू; 13 तासांनंतरही बचावकार्य सुरूच)
सीएम बिरेन सिंह म्हणाले, 'लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये, गंभीर जखमींना 2-2 लाख रुपये आणि कमी गंभीर जखमींना 25,000 रुपये नुकसानभरपाई दिली जाईल. यासोबतच ज्यांची घरे जळाली आहेत त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाणार आहे.’ भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या 105 कंपन्या मणिपूरमधील मीतेई समुदाय आणि आदिवासींमधील हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.