ST Bus | (Photo Credits: MSRTC)

दिवाळीच्या सणात अनेक जण आपल्या गावी एसटीचा वापर हा करतात. राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या 15 दिवसात एसटी महामंडळाने तब्बल 330 कोटी रुपयांची कमाई केली आहे. राज्यात अनेक प्रवाशांनी आपली पहिली पसंती ही लालपरीलाच दिली आहे. हंगामी दरवाढ करूनही अनेक प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  (हेही वाचा - Mumbai Air Pollution: मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषणाबाबत सरकार ॲक्शन मोडवर; CM Eknath Shide यांनी घेतले मोठे)

दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या आणखी दिवस असणार आहे. यामुळे अजूनही या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका देखील महामंडळाला पडला. त्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते.

काही दिवसांपूर्वी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रानुसार यंदाच्या दिवाळीच्या हंगामात सर्व गाडय़ांच्या तिकीट दरात सरसकट 10 टक्के भाडेवाढ होती. मात्र, भाडेवाढ होऊनही अनेक प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करण्यास पसंती दिली. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत एसटीला राज्यभरातून 328 कोटी 40 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे यातील 31 कोटी 60 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न भाऊबीजेच्या दिवशी मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.