गेल्या काही दिवसांपासून देशात टोमॅटोच्या (Tomatoes) किंमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोने अनेक लोकांच्या घराचे बजेट बिघडवले आहे. अशात आता टोमॅटोशी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) शहडोलमध्ये नवरा जेवण बनवताना टोमॅटो वापरतो म्हणून त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. आता पोलीस टोमॅटोमुळे निर्माण झालेल्या नवरा-बायकोच्या भांडणात तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहडोल जिल्ह्यातील धनपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय जयस्वाल यांनी सांगितले की, परिसरातील बाम्होरी गावात राहणारा संदीप वर्मन दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात आला होता. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी आपल्या 4 वर्षाच्या मुलीसह कुठेतरी निघून गेली आहे. संदीपकडून कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने सांगितले की, तो एक छोटासा ढाबा आणि टिफिन सेंटर चालवतो. अशा भाजी करताना तो टोमॅटोचा वापर करतो व याच रागातून त्याची पत्नी आरतीला राग आला व ती घर सोडून निघून गेली.
यावेळी दोघांमध्ये किरकोळ वादही झाला होता. संदीपने बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी तिने ती उमरिया येथील बहिणीच्या घरी असल्याचे सांगितले. आरतीने पोलिसांना सांगितले की, ती तिच्या पतीवर थोडी रागावली आहे व ती काही दिवसांनी परत येईल. (हेही: विना सांभर स्पेशल मसाला डोसा ग्राहकास देणाऱ्या उपहारगृहास 3500 रुपयांचा दंड, बिहारमधील घटना)
पुढे काही कालावधीनंतर पोलिसांनी पुन्हा आरतीशी संपर्क साधला त्यावेळी तिने सांगितले की, संदीप वर्मन दारूच्या नशेत तिला मारहाण करत असे व तिला याचा त्याला राग आहे. यामुळे ती आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह बहिणीच्या घरी गेली आहे. मात्र संदीपने हे सर्व आरोप नाकारले असून फक्त टोमॅटोच्या रागातूनच आपली पत्नी सोडून गेल्याचे सांगितले. संदीप आणि आरतीचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.