प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) टिकमगड (Tikamgarh) शहरात एका 16 वर्षीय मुलाने आपल्या आईची (Mother) गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई सतत रागावते, मारहाण करते या रागातून 11 वीच्या विद्यार्थ्याने आईची हत्या केली. मुलाने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तो तिथेच थांबला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिकमगड जिल्ह्यातील देहाट पोलीस स्टेशन हद्दीतील भगत नगर कॉलनीत मंगळवारी दुपारी अकरावीतल्या अल्पवयीन मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीने गोळ्या झाडून आईची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी मुलाला अटक करून पुढील कारवाई सुरू केली.

टिकमगडचे अतिरिक्त एसपी सीताराम सत्या यांनी सांगितले की, आरोपी मुलगा अजून अल्पवयीन आहे व या संपूर्ण प्रकरणात आरोपीसह मृताच्या पतीचीही चौकशी सुरू आहे. चौकशीत आरोपी मुलाने सांगितले की आईचे त्याच्यावर प्रेम नव्हते. ती सतत भांडायची, त्यामुळे रागाने तिने आईची हत्या केली. गोळी लागल्याने आईचा जागीच मृत्यू झाला आणि हत्येनंतर आरोपी मुलाने स्वतः पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. (हेही वाचा: Bengaluru: नागरिकाला स्कूटीसोबत नेले फरफटत, बंगळुरु येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी 12:30 वाजता एका 17 वर्षीय मुलाने त्याच्या आईवर वडिलांच्या लायसन्स गनने गोळ्या झाडल्याचा फोन आला होता. पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी मुलगा खुर्चीवर बसलेला दिसला. आईला मारल्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. घटनास्थळी तपासासाठी एफएसएल पथकाला पाचारण करण्यात आले. आरोपी तरुणाचे वडील बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांनी तीन लग्ने केली होती. पहिल्या दोन पत्नींपासून त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी तिसरे लग्न केले होते, आरोपी मुलगा हा तिसऱ्या पत्नीचा मुलगा आहे.