इंदूरच्या (Indore) परदेसी पुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी द्रव्य प्राशन केले. कंपनीने नुकतेच सातही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या सर्व कर्मचाऱ्यांना इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्या केलेल्यांमध्ये जमनाधर विश्वकर्मा, दीपक सिंग, राजेश मेमोरिया, देवीलाल करेडिया, रवी करेडिया, जितेंद्र धामनिया, शेखर वर्मा यांचा समावेश आहे. ही घटना घडल्यानंतर कंपनीचे मालक रवी बाफना आणि पुनीत अजमेरा बेपत्ता आहेत. सध्या परदेशी पुरा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांची सर्वांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मालकाने एक नवीन कंपनी उघडली होती व या नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना त्या नवीन कंपनीत काम देण्याबद्दल आश्वासन देण्यात आले होते. मात्र तसे घडले नाही. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी विष प्राशन केले.
कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, मालकाने बुधवारी त्यांना जुन्या कंपनीतून काढल्यानंतर बाणगंगा येथील दुसऱ्या कंपनीत कामावर जाण्यास सांगितले. त्यांच्या जागेवर काम करण्यासाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता येथून नवीन लोकांना आणण्यात आले होते. मात्र कंपनीच्या या निर्णयामुळे जुन्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर फार मोठा परिणाम झाला व त्यामुळे या सर्वांनी ठरवून हे पाऊल उचलले. (हेही वाचा: नवऱ्याने दाताने तोडला बायकोच्या नाकाचा लचका; मांसाचा तुकडा घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात, जाणून घ्या कारण)
उपनिरीक्षक अजय सिंह, कुशवाह पोलीस स्टेशन परदेशी पुरा यांनी सांगितले की, या सातही जणांना मालकाकडून अनेक महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता आणि त्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये हलवले जात होते. या लोकांनी मालकाकडे पगार मागितला होता, मात्र त्यांना पैसे न मिळाल्याने मजुरांनी हे पाऊल उचलले. सध्या याबाबत अधिक माहिती घेतली जात असून, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सर्व जण जबाब देण्याच्या स्थितीत आहेत.