Madhya Pradesh Rain

मध्य प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे नर्मदा आणि  शिप्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोक्याच्या पातळीवरुन या दोन्ही नद्या सध्या वाहत आहेत. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्ग ही नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे नर्मदा नदीला महापूर आल्याचं पाहायला मिळतयं. तसेच या महापुरामुळे  उज्जैन - इंदूर - बुऱ्हाणपूर - सोलापूर हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद ठेवण्यात आलाय.  दरम्यान हा महामार्ग बंद असल्यामुळे पर्यटनासाठी गेलेले अनेक लोक मध्य प्रदेशात अडकल्याचं शक्यता वर्तवण्यात आली. तर पुढील 24 तास पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती खांडव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या ओंकारेश्वर आणि मोरटक्का परिसरात बचाव कार्याची मोहीम देखील राबवण्यात येतेय.  (हेही वाचा - GST Fraud: पालघरमध्ये जीएसटी घोटाळ्याचा पर्दाफाश, खासगी कंपनीच्या मालकाला अटक)

या पुरामुळे नदीकाठच्या गावांना देखील मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. तसेच इंदूर,  नर्मदापुरम, रतलाम, उज्जैनमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. ओंकारेश्वरमध्ये धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे जबलपूर, नरसिंहपुर, रायसेन, नर्मदापुरम,  खंडवा जिल्ह्यांतील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.