Madhya Pradesh: माणुसकीला काळीमा! घरातून पळून गेल्याच्या रागातून तरुण-तरुणीच्या गळ्यात टायर घालून समाजासमोर नाचवले; Video व्हायरल, तिघांना अटक
माणुसकीला काळीमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील धार (Dhar) येथे एका तरुण आणि तरुणीला अमानुष वागणूक देण्यात आली आहे. या ठिकाणी 21 वर्षीय तरुण आणि 19 वर्षीय तरुणी घरातून पळून गेले असता, त्यांच्या गळ्यात मोटारसायकलचे टायर (Motorcycle Tyres) घालून त्यांना सर्वांसमोर नाचवले. धार जिल्ह्यातील कुंडी गावातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला. यातील तीन आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली.

महत्वाचे म्हणजे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीच्या गळ्यातही टायर घालून तिलाही नाचण्यास भाग पाडले असल्याचे दिसत आहे. या मुलीवर तरुण व तरुणीला घरातून पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पुरुष तरुण आणि दोन्ही मुलींच्या गळ्यात टायर घालताना आणि मुलाला काठीने मारहाण करताना दिसत आहे.

एएसपी देवेंद्र पाटीदार यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रकरण जिल्हा मुख्यालयापासून 70 किमी अंतरावर असलेल्या गांधवणी पोलीस स्टेशन परिसरातील कुंडी गावाचे आहे. या वर्षी जुलैमध्ये मुलगा आणि मुलगी घरातून पळून गुजरातला गेले होते. या गोष्टीचा राग मुलीच्या कुटुंबीयांमध्ये होता. 12 सप्टेंबर रोजी हे दोघेही घरी परतल्यावर, दोघांना आणि त्यांना मदत करणाऱ्या मुलीला ही शिक्षा देण्यात आली. (हेही वाचा: Uttar Pradesh Rape Case: उत्तर प्रदेशमध्ये 14 वर्षीय मुलीवर बस कंडक्टरचा बलात्कार, पोलिसांनी घातल्या आरोपीला बेड्या)

मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मंगळवारी, त्यांच्याबाबत घडलेल्या अमानुष वागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडील, तिचे भाऊ आणि नातेवाईकांविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या कलम 254, 323, 506, 354, 363, 343 आणि 147 नुसार गुन्हा दाखल केला आहे.