भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL) कंपनीचे उपमहाव्यवस्थापक (DGM) हनी ट्रॅपच्या जाळ्यात फसले आहेत. मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ (Bhopal) येथे ही घटना घडली. या प्रकरणात आतापर्यंत एका संशयितास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेल कंपनीचे हे अधिकारी (BHEL DGM Honey Trap Victim) शहरातील साकेत नगर परिसरात राहतात. स्वातंत्र्यदिनाच्या आगोदर म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी झालेल्या एका पार्टीमध्ये शशांक वर्मा नावाच्या कंत्राटदाराने त्यांची ओळख दोन महिलांसोबत करुन दिली. त्यानंतर दोन दिवसांनी त्या दोघींपैकी एक महिला या अधिकाऱ्यास हॉटेलच्या रुममध्ये भेटली.
अधिकाऱ्याच्या फोनवर पाठवले अश्लिल व्हिडिओ
भोपाळ येथील हॉटेलमध्ये झालेली भेट विस्मरणात टाकून आपल्या दैनंदिन कामात व्यग्र झालेल्या या अधिकाऱ्याचा फोन अचानक वाजला. ज्यावर शशांक वर्मा याचे नोटीफिकेशन दिसत होते. या अधिकाऱ्याने तातडीने फोन उघडून पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वर्मा याने सदर महिलेसोबतचे फोटो आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओ या अधिकाऱ्याच्या (BHEL officer) फोनवर पाठवले होते. घडला प्रकार आपण हनी ट्र्रॅपचे शिकार झाल्याचे काही सेकंदातच या अधिकाऱ्याच्या लक्षात आला. शशांक वर्माने अधिकारी आणि महिलेच्या हॉटेलवरील भेटीवर पाळत ठेवली होती आणि या भेटीतील खासगी क्षणांचे त्याने चित्रीकरण केले होते. (हेही वाचा, Honey Trap Case in Pune: 78 वर्षीय व्यक्तीकडून लग्नाचं आमिष दाखवून डेटिंग अॅपच्या नावाखाली 1 कोटी उकळले)
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
पोलिसांनी सांगितले की, वर्मा आणि त्या दोन महिलांनी भेल कंपनीच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यास हनी ट्रॅपच्याजाळ्यात अडकवले होते. महिलेसोबतचे खासगी व्हिडिओ फोनवर पाठवून तो अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करत होता. धक्कादायक म्हणजे हा प्रकार दडपण्यासाठी त्याने चक्क 25 लाख रुपयांची मागणी केली होती. रक्कम नाही दिली तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. (हेही वाचा, Mazagon Dock Worker In Honey Trap: माझगाव डॉक येथील कर्मचारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात; महाराष्ट्र एटीएसकडून अटक)
तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून धमकी
पीडित अधिकाऱ्याने 2.5 लाख रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये वर्मा यास पाठवलीही होती. इतर रक्कम पाठविण्यासाठी त्यांनी काही काळ वेळ मागितला. दरम्यान, या अधिकाऱ्यास एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण गुन्हे अन्वेशन विभागातील पोलीस अधिकारी असल्याचे सांगत स्वत:ची ओळख करुन दिली. त्याने भेल अधिकाऱ्यास सल्ला दिला की, वर्मा याची मागणी पूर्ण करा नाहीतर तुम्हाला महिलेवर बलात्कार केलेप्रकरणी अटक करु.
वर्मा आणि कथीत पोलीस अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून भेल अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी वर्मा यास अटक केली. पोलीस उपायुक्त श्रद्धा तिवारी यांनी सांगितले की, आम्हाला तक्रार मिळताच आम्ही गुन्हा नोंद करुन घेतला आहे आणि प्रकरणाच्या पुढील तपासासाठी एक पथकही नेमले आहे.