
आज नवीन महिना नवी सुरूवात आहे. पण या महिन्याची सुरूवात पुन्हा महागाईच्या भडक्याने झाली आहे. या महिन्यात नवरात्र साजरी केली जाणार आहे. सणासुदीचा काळ आता सुरू होईल पण अशातच ऑईल मार्केटिंग कंपनींकडून कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत 209 रूपयांनी वाढवली आहे. नवे दर आजपासूनच लागू केले जाणार आहेत. त्यामुळे दिल्लीत आजपासून 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 1731.50 झाली आहे. परिणामी आता हॉटेलचं खाणं खिशाला चाट पाडणारं ठरू शकतं.
ऑगस्ट महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 200 रूपयांची घट केल्यानंतर आता महिन्याभरातच कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.
व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही एलपीजी सिलिंडरसाठी दरांचा आढावा हा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घेऊन त्याच्यामध्ये वाढ घट घोषित केली जाते. याआधी ऑगस्टमध्ये ओएमसीने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 99.75 रुपयांनी कमी केल्या होत्या.
मागील महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शनला मंजुरी दिली, जी पुढील तीन वर्षांत दिली जाईल. या जोडण्यांवर एकूण 1,650 कोटी रुपये खर्च येणार आहे.