blast| Image only representative purpose (Photo Credits: Pxhere)

गाझियाबादमधील (Ghaziabad) तिला मोर परिसरात मंगळवारी एक मोठा अपघात झाला. या ठिकाणी घरात सुरू असलेल्या एलईडी टीव्हीचा (LED Television) अचानक स्फोट झाल्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई आणि एक मित्र गंभीर जखमी झाले. स्थानिक पोलीस (गाझियाबाद पोलीस) या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ऑटोचालक निरंजन त्याच्या कुटुंबासह हर्ष विहारमध्ये राहतात.

त्यांचा मुलगा ओमेंद्र आणि त्याचा मित्र करण घरात टीव्ही बघत होते, तेवढ्यात त्यांची पत्नी ओमवतीही तिथे आली आणि तिघेही टीव्ही बघू लागले. त्यानंतर अचानक एलईडी टीव्हीचा स्फोट होऊन संपूर्ण खोलीत धुराचे लोट पसरले. हा स्फोट एवढा मोठा आवाज झाला की आजूबाजूचे लोक घरातून बाहेर आले. खोलीच्या भिंतींनाही तडे गेले.

एलईडी टीव्हीचा स्फोट झाल्याने खोलीत उपस्थित असलेले ओमेंद्र, त्याचा मित्र करण आणि ओमेंद्रची आई ओमवती हे गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान ओमेंद्रचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीसही रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी ओमेंद्रचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, अपघाताच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे. (हेही वाचा: Dehradun: लग्नाच्या वऱ्हाडाची बस घाटात उलटली, 25 जागीच ठार; उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथील घटना)

उच्च व्होल्टेजमुळे एलईडी टीव्हीचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याची कसून चौकशी केली जाईल. दरम्यान, गाझियाबादमधील लोणी येथील बबलू गार्डनमध्ये आज सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एक घर कोसळले. या अपघातामध्ये दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून ते मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.