महाकुंभ किंवा कुंभमेळा (Maha Kumbh), हा भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरेचा प्रतिक आहे. केवळ भारतामध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये महाकुंभ त्याच्या धार्मिक महत्वासाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून लाखो लोक कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारतामध्ये येतात. यंदा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी असे 45 दिवस महाकुंभ चालणार आहे. यासाठी 40 कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. यावर्षी महाकुंभमध्ये एक विशेष उपस्थिती असणार आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. यंदा ॲपलच्या मालकीण लॉरेन पॉवेल जॉब्स (Laurene Powell) महाकुंभसाठी भारतामध्ये येणार आहेत.
स्वामी कैलाशनंद जी महाराज यांनी बुधवारी लॉरेन पॉवेल यांच्या उपस्थितीबद्दल पुष्टी केली. एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, त्यांनी लॉरेन पॉवेल यांना 'कमला' असे हिंदू नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय लॉरेन पॉवेल जॉब्स 13 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत प्रयागराजमध्ये राहणार आहेत. यावेळी त्या महाकुंभात प्रथमच स्नान करतील. यासह महत्वाचे म्हणजे त्या कल्पवास देखील करणार आहेत. हे पाऊल त्यांचे भारतीय संस्कृतीशी असलेले खोल नाते दर्शवते. लॉरेन पॉवेल जॉब्स या ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पौष पौर्णिमेच्या दिवशी त्या संगमात पहिले स्नान करणार आहेत. यासोबतच त्या कल्पवासही करणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था निरंजनी आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात करण्यात आली आहे. 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कथेच्या त्या यजमानदेखील असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अब्जाधीश लॉरेन पॉवेल जॉब्स प्रयागराजच्या महाकुंभात 17 दिवस साधूंसोबत साधे जीवन जगणार आहेत.
कल्पवास ही एक प्राचीन हिंदू धार्मिक परंपरा आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ तपश्चर्या, भक्ती आणि ध्यानात घालवते. कल्प म्हणजे दीर्घ काळ आणि वास म्हणजे वास्तव्य. कल्पवासी त्यांच्या दिवसाची सुरुवात पवित्र नदीत स्नान करून करतात, त्यानंतर ध्यान, उपासना आणि धार्मिक प्रवचनांमध्ये भाग घेतात. या प्रक्रियेमुळे आध्यात्मिक शुद्धता आणि संतुलन वाढते. (हेही वाचा: Ayodhya: रामलल्लाची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला झाली, मग 11 जानेवारीला जयंती का साजरी केली जाणार? जाणून घ्या)
महाभारतातही कल्पवासाचा उल्लेख आहे. भीष्म पितामहांनी कुरुक्षेत्र युद्धानंतर कल्पवासात मृत्यूपर्यंतचा काळ घालवला. या काळात ते फक्त तपश्चर्या, प्रार्थना आणि ध्यान करत होते. युधिष्ठिरानेही पांडवांच्या वनवासात तपश्चर्या करण्याचे ठरवले होते. महाभारतात कल्पवासाचे मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व होते. आता लॉरेन पॉवेल जॉब्स या कुंभमेळ्यावेळी 17 दिवस कल्पवास करणार आहेत.