Landslide Hits Mata Vaishno Devi Yatra Route | Twitter

Landslide Hits Mata Vaishno Devi Yatra Route: जम्मू आणि काश्मीरच्या कटरा येथील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी यात्रेमध्ये (Vaishno Devi Yatra 2025) सोमवारी सकाळी मोठा खळबळजनक प्रसंग घडला. बाणगंगा परिसरात सकाळी सुमारे 8 वाजता भूस्खलन (Landslide) झाले. यात काही यात्रेकरू ढिगाऱ्याखाली अडकले असून काही जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. हे भूस्खलन बाणगंगा क्षेत्राजवळ घडले. याठिकाणी अनेक घोडेस्वार व यात्रेकरू जुन्या मार्गावरून यात्रा सुरू करतात. डोंगरावरून अचानक मोठे दगड व मातीचा ढिगारा कोसळल्याने यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बचाव कार्य तातडीने सुरू -

भूस्खलनाची माहिती मिळताच, पोलिस, श्राइन बोर्डचे कर्मचारी, पालखी सेवा पुरवठादार यांचे बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. चार अडकलेल्या यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Shri Amarnathji Yatra Suspended for Today: अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर भूस्खलन, महिला भाविकेचा मृत्यू; यात्रा स्थगित)

आश्रयस्थानांचे नुकसान

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे मार्गावर उभ्या असलेल्या आश्रय शेड्सना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने, बचाव पथकांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अपघात टळला.

माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन - 

वाहतूक तात्पुरती स्थगित -

कटरा ते भवन या जुन्या मार्गावरून दररोज हजारो भाविक चालत जातात. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. भाविकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तथापी, या घटनेबाबत स्थानिक प्रशासन किंवा श्राइन बोर्डाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पुढील भूस्खलनाची शक्यता लक्षात घेता संबंधित यंत्रणा सतर्क आहेत.